सिरोही (राजस्थान) : भारतामध्ये भगवान शिवाची अनेक प्राचीन आणि अनोखी मंदिरे आहेत, ज्यांच्याशी विविध कथा आणि रहस्ये जोडलेली आहेत. राजस्थानमधील आबू रोडवर (माऊंट आबूजवळ) स्थित ‘अचलेश्वर महादेव मंदिर’ हे यापैकीच एक अत्यंत अनोखे आणि रहस्यमय मंदिर आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जगातील हे एकमेव असे शिवमंदिर मानले जाते, जिथे भगवान शिवाच्या मूर्तीची किंवा शिवलिंगाची नाही, तर त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. या मंदिरातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे येथील शिवलिंग किंवा पाषाण दिवसातून तीन वेळा आपला रंग बदलते. स्थानिकांच्या आणि भाविकांच्या श्रद्धेनुसार, सकाळी या शिवलिंगाचा रंग लालसर दिसतो, दुपारी तो केशरी रंगात बदलतो, तर संध्याकाळच्या वेळी याचा रंग काळसर होतो. हा रंग कसा बदलतो, यामागील शास्त्रीय कारण शोधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला, परंतु अद्याप याचे गूढ उकललेले नाही.
पौराणिक कथेनुसार, एकदा हिमालय पर्वतावर भगवान शिव तपश्चर्येत लीन असताना ‘अर्बुद पर्वत’ (आजचा माऊंट आबू) हलू लागला होता. त्यामुळे संपूर्ण परिसर आणि तेथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले होते. पृथ्वीचे संतुलन बिघडू नये आणि हा पर्वत स्थिर राहावा म्हणून भगवान शिवाने हिमालय पर्वतावरूनच आपला उजवा पाय ताणून त्याचा अंगठा अर्बुद पर्वतावर ठेवला. अंगठ्याचा स्पर्श होताच तो पर्वत स्थिर झाला. म्हणूनच या ठिकाणी महादेवाच्या अंगठ्याची पूजा केली जाते आणि या अंगठ्यामुळेच माऊंट आबूचा पर्वत आजही ‘अचल’ (स्थिर) उभा आहे, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. अंगठ्याच्या खाली एक नैसर्गिक आणि खोल खड्डा (गर्भगृह) आहे. या खड्ड्यात कितीही पाणी टाकले तरी ते कुठे जाते, हे आजपर्यंत कोणालाही शोधता आलेले नाही. मंदिरात महादेवाला अर्पण केलेले पाणी किंवा दूध या खड्ड्यात सरळ निघून जाते, मात्र हा खड्डा कधीही भरत नाही. इतिहासाचा आणि निसर्गाचा अद्भुत मिलाफ असणारे हे अचलेश्वर महादेव मंदिर आजही जगभरातील पर्यटकांचे आणि शिवभक्तांचे मोठे श्रद्धास्थान बनून राहिलेले आहे.