विश्वसंचार

9 कोटी रुपयांचा स्वेटर!

Arun Patil

लंडन : थंडीचा हंगाम आता हळूहळू सुरू होईल आणि अशा परिस्थितीत स्वेटर्सना मागणी वाढणे साहजिकच असेल. बाजारात ज्याप्रमाणे स्वस्त स्वेटर्स उपलब्ध असतील, त्याचप्रमाणे महागडे स्वेटर्स देखील दिमतीला असतील. आता, एखादा स्वेटर किती महागडा असू शकेल, याचीही एक काही तरी मर्यादा असते. एक स्वेटर मात्र, अतिशय साधा आणि तो ही अगदी जुना चक्क 9 कोटी रुपयांना लिलावात विकला गेला आहे.

आता हा स्वेटर एकीकडे जुना आहे आणि दुसरीकडे, साध्या स्वेटरप्रमाणेच तो बनवला गेला आहे. इतकी मोठी रक्कम मोजण्याचे दुसरे काहीच कारण सकृतदर्शनी दिसून येत नाही. पण, भले हा स्वेटर साधा दिसत असेल आणि जुना असेल. तरी हा स्वेटर जी व्यक्ती परिधान करत होती, ती मात्र असाधारण होती आणि त्यामुळेच या स्वेटरला इतका भाव मिळाला आहे.

एकवेळ तर अशी होती की, या स्वेटरची मालकीण जगभरातील सर्वात लोकप्रिय महिलांपैकी एक होती. थोडासा अंदाज आलाच असेल. हा स्वेटर दस्तुरखुद्द ब्रिटिश राजकुमारी डायनाचा आहे. ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्सची पत्नी व प्रिन्स हॅरी व विल्यमची आई डायनाचा हा स्वेटर चक्क 9 कोटी रुपयांना लिलावात विकला गेला आहे.

एबीसी न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, या स्वेटरसाठी लिलावाची गुरुवारी सांगता झाली. त्यापूर्वी जवळपास 2 आठवडे यासाठी बोली लावली जात आहे. लिलाव करणार्‍या कंपनीने या स्वेटरची मूळ किंमत 41 लाख रुपये इतकी ठेवली होती. मात्र, नंतर लिलावात ही रक्कम पाहता पाहता वाढत गेली आणि एका अनामिक खरेदीदाराने हा अनमोल स्वेटर 9 कोटी रुपयांना खरेदी केला.

हा स्वेटर नेमका केव्हाचा?

जून 1981 मध्ये प्रिसेस डायना एका पोलो मॅचमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी अवघ्या 19 वर्षांच्या डायनाने लाल स्वेटर परिधान केला होता. त्यावेळी याची इतकी चर्चा झाली की, हा स्वेटर स्टाईल स्टेटमेंट झाले होते. पुढे 1996 मध्ये डायनाने चार्ल्सला घटस्फोट दिला आणि 1997 मध्ये केवळ 36 व्या वर्षी पॅरिसमधील एका भीषण कार अपघातात तिचा मृत्यू झाला होता.

आता डायनाच्या वापरातील वस्तू इतक्या महागड्या किमतीत विकले जाण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. यापूर्वी तिच्या एका बॉलगाऊनला 5 कोटी रुपये इतकी किंमत लाभली होती. डायनाच्या स्वेटरने यापूर्वीचा अमेरिकन गायक-संगीतकार कर्ट कोबेनच्या सर्वात महागड्या 2 कोटी रुपयांच्या स्वेटरचा विक्रम येथे मागे टाकला आहे.

SCROLL FOR NEXT