नेपिडो (म्यानमार) : जगातील विविध संस्कृतींमध्ये सौंदर्याच्या वेगवेगळ्या कल्पना पाहायला मिळतात. परंतु, म्यानमारमधील (ब्रह्मदेश) ‘कायान’ या आदिवासी जमातीत सौंदर्याची व्याख्या अत्यंत वेगळी आणि अंगावर काटा आणणारी आहे. या जमातीतील महिला लहानपणापासूनच आपल्या गळ्यात पितळेची जड आणि उंच कडी घालतात, ज्यामुळे त्यांची मान सामान्य माणसांपेक्षा खूप लांब दिसते. जगभरात या महिलांना ‘जिराफ वूमन’ किंवा ‘लाँग नेक वूमन’ म्हणून ओळखले जाते.
कायान जमातीत मुली ५ ते ६ वर्षांच्या असतानाच त्यांच्या गळ्यात पितळेची पहिली कडी घातली जाते. मुलगी जसजशी मोठी होते, तसतशी तिच्या गळ्यातील कड्यांची संख्या आणि वजन वाढवले जाते. एका प्रौढ स्त्रीच्या गळ्यात सुमारे २० ते २५ कडी असू शकतात, ज्याचे एकूण वजन ५ ते १० किलोपर्यंत असू शकते. वैद्यकीय शास्त्रानुसार, या कड्यांमुळे मान खरीखुरी लांब होत नाही. तर, पितळेच्या जड वजनामुळे खांद्याचे हाड खालच्या बाजूला दाबले जाते. त्यामुळे मान लांब असल्याचा भास होतो. या शतकानुशतके जुन्या परंपरेमागे अनेक लोककथा आणि ऐतिहासिक कारणे सांगितली जातात: प्राचीन काळात कायान लोक जंगलात राहायचे. तेथील हिंस्त्रप्राणी (विशेषतः वाघ) मानवी गळ्यावर थेट हल्ला करायचे.
गळ्याचा बचाव व्हावा म्हणून पितळेची कडी घालण्यास सुरुवात झाली, असे मानले जाते. कायान संस्कृतीत ज्या स्त्रीची मान जेवढी लांब आणि गळ्यात जेवढी जास्त कडी, ती स्त्री तेवढीच सुंदर आणि श्रीमंत मानली जाते. पूर्वीच्या काळात इतर जमातींच्या लोकांनी आपल्या स्त्रियांचे अपहरण करू नये, म्हणून त्यांना विद्रूप किंवा वेगळे दाखवण्यासाठी ही प्रथा सुरू झाली असावी असाही एक सिद्धांत आहे. कायान जमातीचे लोक प्रामुख्याने म्यानमारच्या ‘कायाह’ राज्यात राहतात. मात्र, म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे या जमातीतील अनेक लोक शेजारील थायलंड देशाच्या सीमेवर (चेयांग माई भागात) स्थलांतरित झाले आहेत. आधुनिक काळात नवीन पिढीतील काही मुली या त्रासदायक परंपरेपासून दूर जात असून, कडी घालणे बंद करत आहेत.