Fan Misconceptions | ‘या’ देशात पंख्यांबाबत आहेत भलतेच गैरसमज! 
विश्वसंचार

Fan Misconceptions | ‘या’ देशात पंख्यांबाबत आहेत भलतेच गैरसमज!

कंपन्याही थेट इशारा लिहून विकतात पंखे!

पुढारी वृत्तसेवा

सेऊल : उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक घरात पंखा चालवतात. भारतासारख्या देशात पंख्याशिवाय माणसाची उकाड्याने लाहीलाही होते. परंतु, जगात एक असा देश आहे, जिथे बंद खोलीत विजेचा पंखा चालू ठेवून झोपल्यास माणूस पुन्हा कधीच उठणार नाही, म्हणजेच त्याचा मृत्यू होईल, अशी एक विचित्र धारणा (अंधश्रद्धा) पसरली आहे. ही भलतीच धारणा दक्षिण कोरियासारख्या ‘विकसित’ देशात आहे, हे विशेष!

दक्षिण कोरियात या भीतीचा लोकांच्या मनात इतका धसका बसला आहे की, आजही तेथील लोक रात्री पंखा चालू ठेवून झोपायला घाबरतात. तेथे या प्रकाराला ‘फॅन डेथ’ असे म्हटले जाते; पण खरंच असं होणे शक्य आहे का? भारतात आपण वर्षानुवर्षे बंद खोलीत पंखा सुरू ठेवूनच डाराडूर झोपतो, त्याशिवाय झोपही येत नाही! रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डॉक्टर आणि संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरियातील या सर्व गोष्टी निरर्थक असून, अशा दाव्यात कोणताही वैज्ञानिक आधार नाही. परंतु, असे असूनही तेथील स्थानिक प्रसारमाध्यमे, पंखा बनवणाऱ्या कंपन्या, सरकारी संस्था आणि काही आरोग्य तज्ज्ञसुद्धा लोकांना हेच सांगत राहतात की, उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी पंखा चालू ठेवून ते आपला जीव धोक्यात घालत आहेत.

सरकारच्या ‘कोरिया कन्झ्युमर एजन्सी’ने म्हटले आहे की, उन्हाळ्यात जेव्हा खूप जास्त उष्णता आणि दमटपणा असतो, तेव्हा दरवर्षी पंख्यामुळे गुदमरून (किंवा हायपोथेमियामुळे) लोकांचा मृत्यू होतो. एजन्सीच्या अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे ७ ते १० लोकांचा मृत्यू ‘फॅन डेथ’मुळे होतो. दक्षिण कोरियातील सर्वात मोठी पंखा बनवणारी कंपनी ‘शिनिल इंडस्ट्रियल कंपनी’ आपल्या उत्पादनांसोबत एक चेतावणी जारी करते, ज्यामध्ये ग्राहकांना रात्री पंख्याची हवा थेट स्वतःच्या अंगावर न घेण्याचा सल्ला दिला जातो. त्या इशाऱ्यात लिहिले असते, ‘या उत्पादनामुळे गुदमरून किंवा हायपोथेमियामुळे मृत्यू होऊ शकतो.’

बऱ्याच वर्षांपूर्वी स्थानिक प्रसारमाध्यमांनी ‘फॅन डेथ’चे एक प्रकरण चालवले होते, ज्यामध्ये एका ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. स्थानिक टीव्ही नेटवर्कनुसार, तो व्यक्ती रात्रभर दारू प्यायल्यानंतर पंख्यासमोर झोपला होता आणि नंतर एका लहान लॉजच्या खोलीत तो मृत अवस्थेत आढळला. या घटनेनंतर ही अफवा संपूर्ण आशियात वेगाने पसरली. सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रोफेसर यू ताई-वू यांच्या मते, अशा मृत्यूंसाठी पंख्याला जबाबदार धरण्याचे एक मुख्य कारण म्हणजे तपासकर्त्यांचा निष्काळजीपणा असू शकतो. यू म्हणाले, ‘लोक फॅन डेथवर विश्वास ठेवतात. कारण, एकतर त्यांना मृतदेह दिसतो आणि दुसरा पंखा चालू असलेला आढळतो. परंतु, केवळ पंखा चालू ठेवून झोपल्यामुळे कोणत्याही सामान्य आणि निरोगी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकत नाही. उन्हाळ्यात पंखा चालवल्याने कोणत्याही आरोग्य समस्या, विशेषतः हायपोथेमिया होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT