व्हिएन्ना : सोशल नेटवर्किंग साईटस्वर एक भयंकर व्हिडीओ पोस्ट झाला असून, यात एक सुरक्षारक्षक डायव्हिंग बोर्डवरून उडी मारण्यास घाबरणार्या एका व्यक्तीला चक्क लाथ मारून खाली ढकलल्याचे निदर्शनास आले आहे.
अतिशय धक्कादायक ठरलेल्या या घटनेत 10 मीटर उंचावरील एका डायव्हिंग बोर्डवर एक तरुण चढला खरा; पण तो तेथून खाली पाण्यात उडी मारण्यास घाबरत होता. आता तो तरुण उडी मारण्यासही धजावत नव्हता आणि तेथून त्याला मागेही यायचे नव्हते. सुरक्षारक्षक प्रारंभी त्याला समजावून सांगत होता; पण तरीही त्या तरुणाचे धाडस होत नसल्याने अचानक त्या रक्षकाचा पारा चढला आणि त्याने नंतर एक शब्दही न बोलता संतापाच्या भरात इतक्या जोराची लाथ दिली की, तो तरुण पाहता पाहता खाली कोसळला.
आता असे सांगितले जाते की, तो तरुण आपल्या मर्जीनेच डायव्हिंग बोर्डवर चढला होता आणि तो बोर्डावरून डाईव्ह घेण्यास कचरत असल्याने त्याला दोन सुरक्षारक्षकांकडून खाली उतरण्याचा सल्ला देण्यात आला होता; पण तो तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
यानंतर तिसरा सुरक्षारक्षक तेथे आला आणि त्यानेही समजावून सांगितले. पण तरीही तो युवक परतत नसल्याने या तिसर्या सुरक्षारक्षकाचा अचानक पारा चढला व त्याने त्या युवकाला मागून जोरात लाथ घालत त्याला पाण्यात अक्षरश: ढकलून दिले.
ही घटना ऑस्ट्रियातील असून याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे एका ऑस्ट्रियाई पब्लिकेशनने जाहीर केले. सदर जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाने देखील ही बाब गांभीर्याने घेतली असून त्या सुरक्षारक्षकाला पुन्हा तलावावर रूजू करून घेतले जाणार नसल्याचे सांगितले.