जम्मू ः जम्मू-काश्मीरमध्ये जम्मूतील डोडा जिल्ह्यात एक देवदार वृक्ष सध्या लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सर्वसाधारणपणे पर्वतीय भागात देवदार वृक्ष अनेक असतात. या वृक्षांमध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. हे वृक्ष 'सिड्रस देवदार' या नावानेही ओळखले जातात. देवदारच्या या झाडांना 'वूड ऑफ गॉड' असेही म्हटले जाते. आता डोडा जिल्ह्यात असाच वृक्ष आढळला ओह जो इतरांपेक्षा काही बाबतीत अनोखाही आहे. तो सर्वात जुना देवदार वृक्ष असल्याचे म्हटले जात आहे. हा वृक्ष 54 फुटांचा असून त्याचा व्यास 35 फूट आहे.
या वृक्षाबाबत वनक्षेत्राच्या अधिकार्यांनीही काही माहिती दिली आहे. त्यांचा दावा आहे की हा वृक्ष जगातील सर्वात मोठा आणि अनेक ऐतिहासिक वैशिष्ट्ये असलेला वृक्ष आहे. ज्याठिकाणी हा वृक्ष सापडला आहे त्या 'चांती बाला' या ठिकाणाला वारसा स्थळ घोषित करण्याची मागणी आता होत आहे. स्थानिक लोकही या देवदार वृक्षाच्या शोधाने खूश आहेत. चांती बाला या ठिकाणी अनेक देवदार वृक्ष आहेत. त्यामधील हा वृक्ष शेकडो वर्षांपूर्वीचा असल्याचे म्हटले जात आहे. आता वैज्ञानिक पद्धतीने लवकरच त्याचे नेमके वय शोधण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने या वृक्षाच्या परिसरातील सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रशासन व संशोधकांच्या नजरेत आता हा वृक्ष आला असला तरी अर्थातच स्थानिक लोकांना या वृक्षाची माहिती होती. स्थानिक सरपंच संसार चंद यांनी सांगितले की गेल्या बारा पिढ्यांपासून आमचे लोक या वृक्षाची पूजाअर्चा करीत आले आहेत!