हैदराबाद : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाणारे हैदराबादचे सातवे निजाम, मीर उस्मान अली खान यांच्या खजिन्याबद्दल आजही जगभरात मोठी उत्सुकता आहे. हा केवळ खजिना नसून, तो मानवी इतिहासातील श्रीमंतीचा एक अद्भुत नमुना मानला जातो.
1940 च्या दशकात निजाम मीर उस्मान अली खान यांची एकूण संपत्ती त्यावेळी 2 अब्ज डॉलर्स इतकी होती, जी त्या काळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या 2 टक्के इतकी मानली जात असे. निजामाच्या खजिन्यातील सर्वात मौल्यवान दागिना म्हणजे ‘जॅकब डायमंड’. सुमारे 184 कॅरेटचा हा हिरा जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा मानला जातो. असं म्हटलं जातं की, खुद्द निजाम या मौल्यवान हिर्याचा वापर त्यांच्या टेबलावर ‘पेपरवेट’ म्हणून करत असत. सध्या हा हिरा भारत सरकारच्या ताब्यात असून तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आला आहे. निजामाचा हा अधिकृत खजिना 173 मौल्यवान वस्तूंनी बनलेला आहे.
यामध्ये असलेल्या मौल्यवान दागिन्यांची ही माहिती : नवरत्नजडित हार : सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये जडवलेले पाचू, माणिक आणि नीलम. पाचूचे बेल्ट : चकाकणार्या पाचूने बनवलेले कंबरपट्टे आणि शिरपेच. मोत्यांचे दागिने : हैदराबाद हे मोत्यांसाठी प्रसिद्ध असल्याने, खजिन्यात हजारो दुर्मीळ मोत्यांच्या माळा आहेत. अलेक्झांड्रियाच्या अत्तरकुप्या : सोन्याच्या अत्तरकुप्या ज्यावर हिरे जडवलेले आहेत. निजामाच्या खजिन्याशी संबंधित एक भाग म्हणजे लंडनमधील ‘नॅशनल वेस्टमिन्स्टर बँक’ (आता रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड) मध्ये जमा असलेले पैसे.
फाळणीच्या काळात निजामाची ही रक्कम वादात अडकली होती. सुमारे 70 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, 2019 मध्ये लंडनमधील कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला. ही रक्कम आता वाढून 35 मिलियन पाऊंडस् (सुमारे 300 कोटी रुपयांहून अधिक) झाली आहे. सामान्यतः हा खजिना सुरक्षेच्या कारणास्तव लोकांसाठी खुला नसतो. मात्र, अधूनमधून राष्ट्रीय संग्रहालयाद्वारे या खजिन्याचे प्रदर्शन भरवले जाते. हैद्राबादच्या चौमहल्ला पॅलेसमध्ये या खजिन्यातील काही वस्तूंच्या प्रतिकृती आणि त्या काळातील छायाचित्रे आजही पर्यटकांचे आकर्षण ठरतात.