भोपाळ : प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आपल्या कुटुंबीयांसमवेत रुद्राक्ष व स्फटिकाच्या माळा विकणारी मोनालिसा भोसले ही तरुणी तिचे सुंदर डोळे आणि मोहक हास्य यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिची लोकप्रियता इतकी वाढली की, तिला कुंभमेळा सोडून मध्य प्रदेशातील महेश्वरमधील आपल्या घरी परतावे लागले. तिला एका चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली आहे. त्याचे चित्रीकरण 12 फेब्रुवारीपासून दिल्लीत इंडिया गेटवर सुरू होणार होतं. मात्र, परवानगी न मिळाल्याने चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. सध्या अनेक ब्रँड तिला मॉडेलिंगसाठी ऑफर देत आहेत. मोनालिसा नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडशी जोडली गेली आहे.
मोनालिसाच्या चित्रपट प्रमोशनचं काम करणार्या टीमने म्हटले आहे की, तिला एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडने अप्रोच केलं आहे. यासाठी तिला 15 लाख रुपये दिले जात आहे. मोनालिसा 14 फेब्रुवारीला या ब्रँडच्या एका कार्यक्रमात सामील होण्यासाठी केरळला जाणार आहे. निर्माते सनोज मिश्रा यांनी आपला आगामी चित्रपट ‘द डायरी ऑफ मणिपूर’मध्ये प्रमुख भूमिकेसाठी मोनासिलाला ऑफर दिली आहे. मोनालिसा आणि तिच्या कुटुंबीयांनी ही ऑफर मान्यही केली आहे. या चित्रपटात मोनालिसा निवृत्त सैन्य अधिकार्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. मात्र, तिच्या भूमिकेसाठीचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी तीन महिने तिला मुंबईत अभिनयाचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे.