Loudest Human Shout | जगातील सर्वात जोरात ओरडणारा माणूस 
विश्वसंचार

Loudest Human Shout | जगातील सर्वात जोरात ओरडणारा माणूस

पुढारी वृत्तसेवा

कॅनबेरा : सर्वसामान्य माणूस जास्तीत जास्त किती मोठ्या आवाजात ओरडू शकतो? असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल? कदाचित समोरील व्यक्ती ऐकू शकेल इतक्याच जोरात ओरडेल, असं उत्तर असू शकतं. मात्र, ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने चक्क टेकऑफ करणाऱ्या जेट विमानाइतक्या जोराने ओरडून नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जोसेफ मॅकग्रेल-बेटअप असे या ५८ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या या अद्‌भुत क्षमतेची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डस्‌’मध्ये झाली आहे.

कॅनबेरा येथे राहणाऱ्या जोसेफ यांनी तब्बल १२२.४ डेसिबल (dB) इतक्या प्रचंड आवाजात ‘नाऊ’ (Now) असा ओरडून हा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी १९९४ मध्ये नॉर्दर्न आयर्लंडच्या अनलिसा फ्लॅनागन या शिक्षिकेने १२१.७ डेसिबल आवाजात ओरडून विक्रम केला होता. जोसेफ यांनी हा ३२ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. हा आवाज चेन सॉ किंवा रुग्णवाहिकेच्या सायरनपेक्षाही अधिक तीव्र आहे. विशेष म्हणजे, या विक्रमासाठी जोसेफ यांनी कोणताही विशेष सराव केला नव्हता.

‘हा विक्रम करताना मला तब्बल ७ वेळा प्रयत्न करावे लागले. त्यानंतर काही दिवस माझा आवाज पूर्णपणे बसला होता,’ अशी प्रतिक्रिया जोसेफ यांनी दिली. जोसेफ यांनी यापूर्वी २०१९ मध्ये तिरंदाजीतही एक वेगवान विक्रम केला होता, जो नंतर एका ७ वर्षांच्या मुलाने मोडीत काढला. आता या विक्रमानंतर जोसेफ यांचे कौतुक होत आहे. शिवाय, त्यांनी जो विक्रम केला त्याचा व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT