A World-Famous Magician | ‘हा’ जादूगार थेम्स नदीच्या पाण्यावर चालला होता! 
विश्वसंचार

A World-Famous Magician | ‘हा’ जादूगार थेम्स नदीच्या पाण्यावर चालला होता!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : पाण्यावर चालणे, हवेत तरंगणे किंवा लोकांच्या मोबाईल फोनला काचेच्या बाटलीत बंद करणे... एखाद्या चित्रपटामध्ये स्पेशल इफेक्टस्‌च्या मदतीने हे दृश्य पाहणे सोपे आहेे; पण जर कोणा व्यक्तीने हे तुमच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष करून दाखवले तर? ‘डायनॅमो’ या नावाने जगभर प्रसिद्ध असलेल्या स्टीव्ह फ्रेन या जादूगाराने अशाच अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करून दाखवत संपूर्ण जगाला थक्क केले आहे. जगभरातील करोडो चाहत्यांसाठी तो आधुनिक काळातील सर्वात मोठा जादूचा बादशहा मानला जातो.

डायनॅमोच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि चर्चेतील प्रयोग म्हणजे २०११ मध्ये त्याने लंडनच्या प्रसिद्ध ‘थेम्स नदी’च्या पाण्यावर पायी चालून दाखवले होते. ब्रिटिश संसदेच्या इमारतीसमोर हजारो लोकांच्या आणि कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत तो नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर एखाद्या रस्त्यासारखा चालत गेला. या घटनेने जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले आणि तो एका रात्रीत जागतिक स्टार बनला. फक्त पाण्यावर चालणेच नाही, तर लंडनच्या प्रसिद्ध दुमजली बसच्या छताला फक्त एका हाताने स्पर्श करून बससोबत हवेत तरंगत जाण्याचा कारनामा त्याने केला आहे. याशिवाय, रिओ दि जानेरो येथील प्रसिद्ध ‘ख्राइस्ट द रिडीमर' या पुतळ्यासमोर हवेत स्थिर तरंगत राहून त्याने लाखो लोकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

डायनॅमोचा हा प्रवास सोपा नव्हता. इंग्लंडच्या ब्रॅडफर्ड शहरात एका गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणी त्याला ‘क्रोहन्स’ नावाचा पोटाचा गंभीर आजार झाला होता. या आजारपणामुळे आणि अशक्तपणामुळे शाळेत इतर मुले त्याला त्रास द्यायची. या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्या आजोबांनी त्याला जादूच्या काही युक्त्या शिकवल्या. त्या छोट्या युक्त्यांनी डायनॅमोचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. त्याने आपल्या जादूला आधुनिकतेची जोड दिली. केवळ रंगमंचापुरती मर्यादित न ठेवता त्याने रस्त्यावरील लोकांसोबत ‘स्ट्रीट मॅजिक’ सुरू केली. त्याच्या 'Dynamo: Magician Impossible' या टीव्ही शोने जगभरात लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड तोडले. केवळ तांत्रिक हातचलाखी किंवा ‘इल्यूजन’ वापरून तो अशा गोष्टी करतो, ज्या विज्ञान आणि तर्काच्या पलीकडच्या वाटतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT