सिडनी/लंडन : नैराश्याने ग्रस्त असलेल्या काही व्यक्तींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त झोप येणे, उठल्यावरही प्रचंड थकवा जाणवणे, उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय आणि ऋतू बदलानुसार मनःस्थितीत वारंवार बदल होणे अशी लक्षणे दिसून येतात. ही सर्व लक्षणे शरीराच्या अंतर्गत जैविक घड्याळाशी (Body Clock) संबंधित एका वेगळ्या प्रकारच्या नैराश्याकडे निर्देश करतात, असा दावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी या प्रकाराला ‘सर्काडियन डिप्रेशन’ असे नाव दिले आहे.
‘द ब्रिटिश जनरल ऑफ सायकियाट्री’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, गंभीर, वारंवार उद्भवणाऱ्या किंवा दीर्घकाळ टिकणाऱ्या नैराश्याने ग्रस्त असलेल्या दर चारपैकी एका व्यक्तीमध्ये हा प्रकार आढळू शकतो. या अभ्यासात ‘ऑस्ट्रेलियन जेनेटिक्स ऑफ डिप्रेशन स्टडी’ (AGDS) मधील १८ ते ९० वयोगटातील ११,३८० प्रौढांच्या नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी २,६०४ लोकांमध्ये ‘सर्काडियन डिप्रेशन’ची लक्षणे दिसून आली. या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि सिडनी विद्यापीठातील न्यूरोसायंटिस्ट एमिलियाना टोनिनी यांनी स्पष्ट केले की, ‘‘हा प्रकार केवळ वरवरच्या लक्षणांवरून नाही, तर थेट शरीराच्या जैविक संरचनेवरून ठरवण्यात आला आहे.
शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळातील बिघाड हे याचे मुख्य मूळ आहे, ज्यावर पारंपरिक अँटिडिप्रेसंट औषधे पूर्णपणे प्रभावी ठरतीलच असे नाही.’’ ही ६ प्रमुख लक्षणे महत्त्वाची : संशोधकांनी या प्रकारात व्यक्तींची विभागणी करण्यासाठी सहा घटकांचा आधार घेतला. यापैकी किमान तीन लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा समावेश ‘सर्काडियन’ गटात करण्यात आला. ऋतूनुसार मनःस्थितीत होणारे तीव्र बदल, रात्री उशिरा झोपण्याचे वेळापत्रक, सोशल जेट लॅग (कामाचे दिवस आणि सुट्टीच्या दिवसांमधील झोपेच्या वेळेतील मोठा फरक), रात्रभर जागे राहण्याची सवय, प्रमाणापेक्षा जास्त झोप लागणे (Hypersomnia), सकाळी उठल्यावरही जाणवणारा तीव्र थकवा. संशोधनात असेही आढळून आले की, इतर नैराश्यग्रस्त रुग्णांच्या तुलनेत ‘सर्काडियन डिप्रेशन’ असणारा गट वयाने लहान होता.
सामान्यतः नैराश्य वयाच्या २३ व्या वर्षी सुरू झाल्याचे आढळले असताना, या गटात हा आजार सरासरी वयाच्या १९ व्या वर्षीच सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णांवर नियमित औषधांऐवजी झोप आणि जागृती चक्र नियमित करणारे उपचार अधिक फायदेशीर ठरू शकतात, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. यामध्ये मेलाटोनिन (झोपेचे संप्रेरक) किंवा ‘ब्राइट लाइट थेरपी’चा समावेश असू शकतो. मात्र, हा उपप्रकार अद्याप अधिकृत वैद्यकीय उपचारांमध्ये औपचारिकपणे समाविष्ट व्हायचा असल्याने, प्रत्यक्षात क्लिनिकल उपचारांत बदल करण्यापूर्वी अधिक सखोल संशोधनाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.