मनेसोटा : अमेरिकेतील मिनेसोटा येथील लेक सुपीरियर प्राणीसंग्रहालयातील एका तपकिरी अस्वलाच्या दातावर चक्क इतिहासातील सर्वात मोठा डेंटल क्राऊन (दाताची कॅप) बसवण्यात आला आहे. या अस्वलाच्या तुटलेल्या दाताचे संरक्षण करण्यासाठी ही अनोखी शस्त्रक्रिया करण्यात आली.
‘टुंड्रा’ नावाच्या या अस्वलाचा एक मुख्य सुळा तुटला होता. त्यामुळे त्याला संरक्षण देण्यासाठी खास तयार केलेल्या धातूच्या क्राऊनची गरज होती. 23 जून रोजी प्राणीसंग्रहालयातच एका तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, एका विशेष पशू-दंतवैद्याने हा चांदीच्या रंगाचा क्राऊन टुंड्राच्या दातावर बसवला. ‘टुंड्रा या तपकिरी अस्वलाने दंतचिकित्सा क्षेत्रात इतिहास रचला आहे!’ असे लेक सुपीरियर प्राणीसंग्रहालयाच्या प्रतिनिधींनी सांगितले.
‘आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, टुंड्राला अधिकृतपणे अस्वलावर बसवण्यात आलेला पहिला पूर्ण मेटल क्राऊन मिळाला आहे. इतकेच नाही, तर हा जगातला आतापर्यंतचा सर्वात मोठा पशुवैद्यकीय क्राऊन आहे!’ टुंड्राचा उजव्या बाजूचा सुळा 2023 मध्ये पहिल्यांदा तुटला होता. त्यावेळी प्राणीसंग्रहालयाच्या दंतवैद्यांनी त्यावर ‘रूट कॅनल’ उपचार केले होते; मात्र काही काळानंतर टुंड्राने त्याच दाताला पुन्हा दुखापत करून घेतली.
यानंतर, दाताला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला संपूर्ण कव्हरेज देणार्या क्राऊनची गरज असल्याचे प्राणीसंग्रहालयाच्या टीमने ठरवले. आयडाहो येथील ‘क्रिएचर क्राऊन्स’ या प्राण्यांच्या दातांवर उपचार करणार्या विशेष कंपनीने टुंड्राच्या दुखापतग्रस्त दाताच्या मेणाच्या साच्यावरून हा नवीन क्राऊन तयार केला. हा 6 वर्षांचा तपकिरी अस्वल तब्बल 800 पौंड (सुमारे 360 किलो) वजनाचा आहे आणि जेव्हा तो दोन पायांवर उभा राहतो, तेव्हा त्याची उंची सुमारे 8 फूट (2.4 मीटर) भरते.