टोकियो : उन्हाळ्याच्या दिवसांत शाळेबाहेर उभी असलेली बर्फाच्या गोळ्याची गाडी, शाळा सुटल्यावर हातात ‘काला खट्टा’ आणि त्याचा मनमुराद आनंद घेणारी मुले... या कल्पनेनेच आपल्याला आपल्या बालपणाच्या दिवसांची आठवण येते. कित्येक वर्षांपासून हे ‘देसी आईस्क्रिम’ आपल्या आयुष्याचा एक भाग बनले आहे. मात्र, ते पहिल्यांदा कुठे बनले आणि भारतात याला ‘काला खट्टा’ का म्हटले गेले, याची कहाणी खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. चला तर मग, काला खट्टाच्या या रंजक इतिहासाचा प्रवास जाणून घेऊया.
‘काला खट्टा’ हे नाव ऐकून आपल्याला वाटू शकते की याचा शोध भारतातच झाला असेल; परंतु हा पदार्थ सर्वात आधी जपानमध्ये बनवला गेला होता. तो काळ साधारण ७९४-११८५ च्या दरम्यानचा होता, ज्याला ‘हेयन काळ’ असेही म्हटले जायचे. त्यावेळी ‘काकीगोरी’ या नावाने हे जपानी शेव्ड-आईस (खिसलेला बर्फ) पेय दिले जात असे. त्याकाळी लोक पर्वतांवरून बर्फ आणून तो वितळण्यापासून वाचवण्यासाठी ‘आईस हाऊस’मध्ये साठवून ठेवत असत. या बर्फापासून थंड पेये बनवली जात असत. अशा प्रकारे ‘काकीगोरी’ हे जपानमध्ये उन्हाळ्यात सर्वाधिक आवडते पेय बनले.
जपानमध्ये यात माचा, स्ट्रॉबेरी, चेरी किंवा गोड टरबुजाचा रस घालून ते तयार केले जात असे. जपानमध्ये बनलेले हे पेय १९०० च्या दशकात अधिक लोकप्रिय झाले, जेव्हा जपानी स्थलांतरितांच्या माध्यमातून ते ‘हवाई’ बेटांवर पोहोचले. असे मानले जाते की, अशाच मार्गाने हे पेय भारतातही पोहोचले असावे; ज्याला भारतीयांनी ‘देसी’ रूप देऊन आपलेसे केले. आज गल्लीबोळातील गाड्यांपासून ते बाजार, जत्रा आणि समुद्रकिनाऱ्यांपर्यंत या पेयाने आपले एक खास स्थान निर्माण केले आहे.
भारतात ‘काला खट्टा’ हे नाव त्याच्या गडद निळ्या-जांभळ्या रंगासोबतच त्याच्या आंबट-गोड चवीमुळे पडले. पूर्वीच्या काळी काला खट्टा बनवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात असे, ज्यामध्ये मुख्यत्वे जांभळाचा अर्क वापरला जायचा. याशिवाय, किसलेल्या बर्फावर काळे द्राक्षे, लिंबाचा रस, चवीनुसार मसाले आणि साखरेचा पाक घालूनही हे पेय तयार केले जात असे. आज पाहिले तर ‘काला खट्टा’ हा केवळ जांभूळ किंवा काळ्या द्राक्षांपुरता मर्यादित राहिलेला नाही. यामुळेच याला ‘बर्फाचा गोळा’ असेही म्हटले जाते. आता अनेक फ्लेवर्समध्ये हे पेय बाजारपेठेत उपलब्ध आहे.