यावर्षीची जगातील सर्वात आनंदी देशांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. या 143 देशांच्या यादीत भारताचे स्थान गतवर्षीप्रमाणेच 126 वे आहे. फिनलँड हा देश सलग सातव्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्या देशातील लोक सुखी-समाधानी, आनंदी आहेत की नाही, हे ठरवले जात असते. या यादीतील पहिल्या पाच देशांची ही माहिती...
फिनलँड ः फिनलँडने पुन्हा एकदा या यादीत प्रथम क्रमांक मिळवला असून, त्याने 10 पैकी 7.741 गुण मिळवले आहेत! फिनलँडच्या आनंदाचे रहस्य काय आहे? फिन्समध्ये मजबूत सामाजिक बंध आणि परस्पर विश्वास आहे. उत्कृष्ट सार्वजनिक सेवा, कमी भ—ष्टाचार आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर भर दिल्याने फिनलँडने संकटांचा सामना यशस्वीपणे केला. तसेच, फिन्स ‘हायगे’ म्हणजेच आरामदायक जीवनशैली... एक चांगले पुस्तक, गरम पेय आणि प्रियजनांसोबत वेळ घालवणे याला प्राधान्य देतात. निसर्ग, शांतता आणि समतोल जीवनशैली शोधणार्यांसाठी फिनलँड आदर्श देश आहे.
डेन्मार्क ःडेन्मार्क 7.583 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. डॅनिश लोकांनी ‘हायगे’ या संकल्पनेला आयुष्याचा भाग बनवले आहे. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत सुख, आनंद आणि उबदारपणा शोधणे. मग तो मित्रांसोबत कॉफीचा आस्वाद असो किंवा थंड हिवाळ्यात मऊशार ब्लँकेट आणि गरम जेवण असो! डेन्मार्क उदारतेतही आघाडीवर आहे आणि त्यांच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे उत्तम समतोल राखला जातो. विशेष म्हणजे, वृद्ध डॅनिश नागरिक अत्यंत आनंदी आहेत. म्हणजेच वय जसजसे वाढते, तसतसा आनंदही वाढतो!
आइसलँड ः 7.525 गुणांसह आइसलँड तिसर्या स्थानावर आहे. ज्वालामुखी, गरम पाण्याचे झरे आणि नॉर्दर्न लाईटस् यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात खर्या अर्थाने आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांचा घट्ट सामाजिक बंध. आइसलँडमध्ये जगातील सर्वोच्च सामाजिक समर्थन पद्धतींपैकी एक आहे. येथे लोक अत्यंत दयाळू आणि मदतीसाठी तत्पर असतात. निसर्गासोबतच आइसलँडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम देखील आनंददायक वातावरण तयार करतात.
स्वीडन ः 7.344 गुणांसह स्वीडन चौथ्या स्थानी आहे. येथे मजबूत कल्याणकारी प्रणाली असून, प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सेवा सहज मिळतात. स्वीडन सामाजिक समानतेवर भर देते आणि याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या आनंदात दिसून येतो. मात्र, 30 वर्षांखालील तरुणांना शिक्षण आणि नोकरीच्या तणावामुळे काहीसे कमी समाधान मिळते. पण वृद्धांसाठी मात्र जीवन अधिक सुखकर होत जाते!
नॉर्वे ः 7.292 गुणांसह नॉर्वे पाचव्या क्रमांकावर आहे. येथील भव्य पर्वत आणि सुंदर फ्जोर्ड्स (समुद्रखाड्या) फक्त बघण्यास रम्य नाहीत, तर मानसिक शांततेसाठीही उपयुक्त ठरतात. नॉर्वेजियन लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत करतात, मग ते हायकिंग, स्कीईंग किंवा साध्या निसगर्र्द़ृश्यांचा आनंद घेणे असो. तसेच, उत्तम आरोग्यसेवा आणि घट्ट सामाजिक बंधांमुळे येथील नागरिक उच्च जीवनमान आणि समाधान अनुभवतात.