विश्वसंचार

‘एआय’चे जनकच म्हणतात, यापासून मानवी अस्तित्वाला धोका!

Arun Patil

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना 'एआय' म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या मानवी बुद्धीलाही थक्क करीत आहे. 'एआय'चा वापर आता अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. 'एआय'चे जनक म्हणून डॉ. जेफ्री हिंटन यांना ओळखले जाते. आता त्यांनीच 'एआय' बाबत चिंता व्यक्त केली आहे. 'एआय'मुळे मानवी अस्तित्वाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या प्रत्येकाच्या तोंडावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हे नाव बसलं आहे. आपल्या रोजच्या जीवाचा एआय हळूहळू भाग होत चालले आहे. चॅटजीपीटी सारखं नवं तंत्रज्ञानही एआय आणि डीप लर्निंगवर आधारित आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचे जनक म्हणून डॉ. जेफ्री हिंटन यांची ओळख आहे. मागच्या वर्षीच त्यांनी गुगलमधून राजीनामा दिला होता. एआय तंत्रज्ञानाबाबत जगात उत्सुकता असताना हिंटन यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे.

या तंत्रज्ञानामुळे अनेक लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागू शकतात. तसेच लोकांच्या उत्पन्नात एआयमुळे असमानता दिसू शकते. यासाठी सरकारने याच्याशी संबंधित उपाययोजना हाती घ्यावी, असे हिंटन यांनी सुचविले आहे. हिंटन पुढे म्हणाले की, एआयमुळे कार्यक्षमता आणि संपत्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल. पण, हा पैसा श्रीमंत लोकांकडे जाईल आणि ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यांचे नुकसान होईल. यामुळे समाजाला जबरदस्त हानी पोहोचू शकते, असा सूचक इशारा हिंटन यांनी दिला आहे. हिंटन यांनी यावर उपाय सुचविताना म्हटले की, सरकारने वैश्विक मूलभूत वेतनासंबंधीचे काही निकष ठरवायला हवेत.

त्यामुळे नोकरदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकतील. डॉ. जेफ्री हिंटन यांनी याआधीही एआयच्या धोक्यांची कल्पना दिलेली आहे. एआय चॅटबॉट्सचे काही धोके हे अत्यंत भीतिदायक असल्याचे त्यांनी म्हटले. हिंटन यांच्या मताप्रमाणे काही चॅटबॉट्स मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान बनू शकतात आणि त्यांच्याकडून इतरांचे शोषण केले जाण्याची भीती आहे. जेफ्री हिंटन तर असेही म्हणाले की, एआय स्वतःपासूनच प्रेरणा घेऊन अधिकाधिक विकसित होऊ शकते.

जेफ्री हिंटन यांनी लष्करात एआयचा वापर होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. माझा अंदाज आहे की, आतापासून पाच ते 20 वर्षांपर्यंत एआयवर ताबा मिळविण्याच्या समस्येचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. हिंटनच्या म्हणण्यांनुसार, एआयमुळे मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कारण आपण जैविक बुद्धिमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धिमत्ता तयार केलेली असेल. हे आपल्यासाठी अधिक चिंताजनक आहे. तसेच लोकांना मारण्याचा निर्णय एआयकडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो, अशीही भीती हिंटन यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT