विश्वसंचार

मुलगा झोपेत चालत गेला होता दुसर्‍या शहरात!

Arun Patil

वॉशिंग्टन : झोपेत बोलण्याची, काही बाही खाण्याची तसेच झोपेत चालण्याचीही सवय काही लोकांना असते. मात्र, तुम्ही कधी एखादी व्यक्ती झोपेत चालता चालता एका शहरातून दुसर्‍या शहरात गेल्याचं ऐकलं आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाही असं असू शकतं. पण सध्या अशा एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे, जी 1987 साली घडली होती. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटवर शेअर करण्यात आली आहे. अकरा वर्षांचा एक छोटा मुलगा झोपेत चालत चालत तब्बल 160 किलोमीटर अंतरावरील शहरात गेला होता!

'स्लीपवॉकिंग' ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला झोपेत चालण्याची सवय असते. 6 एप्रिल 1987 रोजी अमेरिकेतील इंडियानामधील पेरू येथे एका रेल्वे ट्रॅकजवळ मायकल डिक्सन नावाचा 11 वर्षांचा मुलगा पायात चप्पल नसलेल्या अवस्थेत सापडला होता, शिवाय त्याने नाईट सूट घातला होता. रेल्वेच्या एका अधिकार्‍याने या मुलाला पाहिले आणि त्याने पोलिसांना बोलावले आणि मायकल ज्या अवस्थेत सापडला होता त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मायकलला कुठे राहतो असे विचारले असता तो पेरूचा नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय तो डेनविले इथे राहत होता, जे ठिकाण पेरूपासून 160 किलोमीटरहून लांब होते.

स्लीपवॉकिंगच्या घटनेच्या रात्री मायकलला त्याच्या आईने रात्री अंथरुणावर झोपलेला पाहिला होता. त्यामुळे तो घरात झोपला आहे असे आईला वाटले. मात्र, जेव्हा पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मायकल विचित्र अवस्थेत सापडला असल्याचे सांगितले तेव्हा आईला धक्का बसला, यावेळी तिने घरात जाऊन मायकल झोपलेल्या जागेवर आहे का तपासले असता तो खरंच तिथे नव्हता. मायकलने इतक्या लांब झोपेत कसा गेला? तर तो झोपेत त्याच्या घराजवळच्या स्टेशनवर एका मालगाडीत चढला. कारण त्याचे घर रेल्वेस्टेशनजवळ होते, त्यामुळे तो ट्रेनमध्ये झोपला.

मात्र, मायकलने मियामी काऊंटी डिपार्टमेंट ऑफ वेल्फेअरमधील केसवर्करला सांगितले की, त्याला तो ट्रेनमध्ये बसल्याचे आठवत नसल्याचे सांगितले. शिवाय यावेळी त्याच्या पायावर खूप जखमा देखील झाल्याचे दिसत होतं. हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत आल्यानंतर मायकेल डिक्सनच्या या स्लीपवॉकिंग प्रकरणाचा दोन वर्षांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. बॉल स्टेट डेली न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात मायकलच्या आईने सांगितले, "मायकल स्लीपवॉक करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, त्याला वारंवार विचित्र स्वप्न पडायची आणि तो नेहमी झोपेत चालायचा; पण तो याआधी कधीही झोपेत चालताना बाहेर गेला नव्हता."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT