रबात : आफ्रिका खंडातील सर्वात श्रीमंत राजा म्हणून ओळखले जाणारे मोरोक्कोचे राजे ‘किंग मोहम्मद सहावे’ सध्या त्यांच्या प्रचंड संपत्तीमुळे आणि सोन्याच्या खाण व्यवसायातील मोठ्या गुंतवणुकीमुळे जगभरात चर्चेत आहेत. १९९९ पासून मोरोक्कोवर राज्य करणारे किंग मोहम्मद सहावे यांची एकूण संपत्ती ५ ते १० अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ४७,००० ते ९५,००० कोटी रुपये) दरम्यान असल्याचा अंदाज लावला जातो.
किंग मोहम्मद सहावे यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत त्यांच्या कुटुंबाची होल्डिंग कंपनी ‘अल माडा’ हा आहे. ही कंपनी बँकिंग, टेलिकॉम, रिअल इस्टेट आणि ऊर्जेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत गुंतवणूक करते. परंतु, राजाच्या अफाट उत्पन्नाचा सर्वात मोठा भाग खाणकाम क्षेत्रातील ‘मॅनेजम ग्रुप’ या कंपनीतून येतो. ही कंपनी सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंच्या उत्खननाचे काम करते. त्यांची सोन्याच्या खाणीत हजारो कोटींची गुंतवणूक आहे. जागतिक बाजारात सोन्याचे वाढते दर पाहता, राजाच्या या शाही घराण्याने सोन्याचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठा मास्टरप्लॅन तयार केला आहे.
अल माडाच्या अंतर्गत काम करणाऱ्या मॅनेजम ग्रुपने आफ्रिकेतील विविध देशांमधील सोन्याच्या खाणींमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी ७५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७,१०० कोटी रुपये) गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ मध्ये या कंपनीने २,१३,००० औंस सोन्याचे उत्पादन केले होते. २०३० पर्यंत हे उत्पादन वर्षाला ५,००,००० औंसपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे कंपनीच्या महसुलात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून तो १.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण कमाईपैकी अर्ध्याहून अधिक भाग हा फक्त सोन्याच्या विक्रीतून येतो.
आफ्रिकेतील इतर देशांमध्येही विस्तार : मॅनेजम ग्रुप केवळ मोरोक्कोपुरता मर्यादित नसून गॅबॉनसह आफ्रिकेतील ७ ते ८ देशांमध्ये सोन्याच्या खाणींचा विस्तार करत आहे. किंग मोहम्मद सहावे यांनी आपल्या सत्ताकाळात अनेक आर्थिक आणि सामाजिक सुधारणा राबवल्या असून आफ्रिकेच्या समृद्ध भूगर्भीय संसाधनांचा (विशेषतः सोन्याचा) योग्य वापर करून त्यांनी आपल्या शाही घराण्याची संपत्ती आणि आर्थिक प्रभाव अधिकच मजबूत केला आहे.