Thailand Death Railway Station | थायलंडमधील ऐतिहासिक ‘डेथ रेल्वे’चे स्टेशन तब्बल ८० वर्षांनंतर पाण्याबाहेर 
विश्वसंचार

Thailand Death Railway Station | थायलंडमधील ऐतिहासिक ‘डेथ रेल्वे’चे स्टेशन तब्बल ८० वर्षांनंतर पाण्याबाहेर

दुसऱ्या महायुद्धातील क्रूर इतिहासाचे पुरावे उघड

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक : दुसऱ्या महायुद्धादरम्यान युद्धकैदी आणि आशियाई मजुरांच्या बळजबरीने केलेल्या छळाची साक्ष देणारे थायलंडमधील कुप्रसिद्ध ‘निथे स्टेशन’ तब्बल दशकांनंतर पुन्हा एकदा जमिनीवर दिसू लागले आहे. हे स्टेशन थायलंडच्या कांचनाबुरी प्रांतातील एका मोठ्या धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले होते. मात्र, ‘वजिरालोंगकोर्न’ धरणाच्या दुरुस्तीसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा उघडा पडला आहे.

‘डेथ रेल्वे’चा काळा इतिहास

दुसऱ्या महायुद्धात जपानने भारतावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने म्यानमारमध्ये (तेव्हाचे बर्मा) रसद पुरवण्यासाठी थायलंड ते म्यानमार दरम्यान २५७ मैल लांबीचा रेल्वे मार्ग तयार केला होता. हा मार्ग अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि धोकादायक भागातून जात असल्यामुळे याला ‘डेथ रेल्वे’ म्हटले गेले. हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी जपानी सैन्याने ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इंडोनेशियातील सुमारे ६०,००० युद्धकैदी आणि लाखो आशियाई नागरिकांना ‘वेठबिगार’ म्हणून कामाला लावले होते. भूक, अमानुष छळ, अतिश्रम आणि आजारांमुळे या कामादरम्यान तब्बल १२,५०० युद्धकैदी आणि ७५,००० हून अधिक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता.

संशोधकांसाठी मोठी संधी

पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि धरणाचे काम ऑगस्टपर्यंत संपण्यापूर्वी संशोधकांना या स्टेशनचा अभ्यास करण्यासाठी एक सुवर्णसंधी मिळाली आहे. जगभरातील इतिहासकार मेटल डिटेक्टर आणि जुने हवाई नकाशे घेऊन या ठिकाणी पोहोचले आहेत. येथे रेल्वेचे मूळ अवशेष, पायाभूत सुविधा आणि त्या काळातील रचनेचा अभ्यास केला जात आहे. थायलंड-बर्मा रेल्वे केंद्राचे संशोधक अँड्र्यू स्नो यांनी सांगितले की, ‘‘ज्या लोकांच्या पूर्वजांनी येथे नरकयातना भोगल्या आणि प्राण गमावले, त्यांच्या नातेवाईकांना हा परिसर दाखवण्यासाठी आणि या काळाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.’’ या रेल्वेच्या इतिहासावर आधारित प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ (१९५७) ने ऑस्कर पुरस्कार देखील जिंकला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT