न्यूयॉर्क : आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात असा समज होता की, पुरुषांमधील हार्मोन्सच कदाचित ब्रेन ट्यूमर वाढवण्यास कारणीभूत ठरतात. ‘ऑन्कोलॉजी-सेंट्रल’च्या मते, हा आजार पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. मात्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका ताज्या संशोधनाने हा जुना समज मोडीत काढला आहे. क्लीवलँड क्लिनिकच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमधील हार्मोन प्रत्यक्षात कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी शरीराला मदतच करतो. शरीरात या संप्रेरकाची कमतरता निर्माण झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि ट्यूमरला वाढण्याची संधी मिळते.
शास्त्रज्ञांनी जेव्हा 1,300 हून अधिक कॅन्सर रुग्णांच्या डेटाची तपासणी केली, तेव्हा काही आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले. जे रुग्ण इतर कारणांमुळे टेस्टोस्टेरॉनची औषधे किंवा सप्लिमेंटस् घेत होते, ते इतर रुग्णांच्या तुलनेत जास्त काळ जगले. ज्यांच्या शरीरात या हार्मोन्सची कमतरता होती, त्यांच्या तुलनेत या रुग्णांच्या जगण्याची शक्यता लक्षणीयरीत्या जास्त होती. जेव्हा शरीरात या संप्रेरकाची कमतरता असते, तेव्हा मेंदूमध्ये एक प्रकारची सूज आणि ताण वाढतो. या तणावामुळे मेंदूच्या भोवती अशी एक भिंत तयार होते जी शरीरातील आजाराशी लढणार्या पेशींना आत शिरू देत नाही.
जेव्हा रक्षक पेशीच ट्यूमरपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तेव्हा ट्यूमरची वाढ वेगाने होऊ लागते. आपल्या मेंदूची रचना अशी असते की, तो प्रत्येक गोष्टीला आत प्रवेश देऊ शकत नाही. टेस्टोस्टेरॉन हार्मोन मेंदूतील वातावरण संतुलित ठेवण्याचे काम करते. जेव्हा हे हार्मोन योग्य प्रमाणात असते, तेव्हा शरीरातील संरक्षक पेशी गरजेनुसार मेंदूत जाऊन ट्यूमरवर हल्ला करू शकतात. संशोधनात असेही आढळले आहे की, या संप्रेरकाची कमतरता होताच मेंदूतील एक विशिष्ट यंत्रणा (कझअ उळी) अतिसक्रिय होते, ज्यामुळे सूज वाढते आणि शरीरात तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वेगाने स्रवू लागतात.