ब्राझील/नवी दिल्ली : लाखो वर्षांपूर्वी डायनासोर नष्ट झाल्यानंतर पृथ्वीवर, विशेषतः दक्षिण अमेरिकेत आपल्या अवाढव्य शरीराने आणि धारदार चोचीने दहशत माजवणाऱ्या 'टेरर बर्डस्' (भयानक पक्षी) बाबत शास्त्रज्ञांनी एक नवा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. संशोधकांच्या मते, हे उडू न शकणारे शिकारी पक्षी आधीच्या अंदाजापेक्षा लाखो वर्षे जास्त काळ जिवंत होते आणि त्यांचा सामना पृथ्वीवरील सुरुवातीच्या मानवाशी झाला असण्याची दाट शक्यता आहे. ब्राझीलमधील एका संग्रहालयात ठेवलेल्या हाडांच्या अवशेषांचे पुनर्निरीक्षण केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला असून, 'पेपर्स इन पॅलेओन्टोलॉजी' या वैज्ञानिक मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
'ड्रमस्टिक'च्या एका हाडाने बदलला इतिहास
यापूर्वी शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की, हे महाकाय पक्षी सुमारे २५ लाख वर्षांपूर्वीच पृथ्वीवरून नष्ट झाले होते. परंतु, ब्राझीलच्या 'पॉन्टिफिकल कॅथोलिक युनिव्हर्सिटी ऑफ मिनास गेराईस' येथील संशोधक व्हिक्टर हुगो मकाडो यांनी संग्रहालयातील १९८० च्या दशकात सापडलेल्या एका जुन्या हाडाचा (पक्षाच्या पायाचे हाड, त्याला ड्रमस्टिक म्हटले जाते) पुन्हा अभ्यास केला. आधी हे हाड एका गिधाडाचे असल्याचे मानले जात होते. मात्र, मकाडो यांनी ओळखले की, हे हाड एका लहान प्रजातीच्या 'टेरर बर्ड'चे आहे. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे हे हाड अवघे २५,००० वर्षे जुने असल्याचे सिद्ध झाले आहे, म्हणजेच शेवटच्या हिमयुगाच्या काळातही हे पक्षी अस्तित्वात होते. शास्त्रज्ञांनी या नवीन प्रजातीला 'एशॅटोर्निस अटेराडोरा' असे नाव दिले आहे, ज्याचा अर्थ 'शेवटचा टेरर बर्ड' असा होतो.
कसे होते हे 'टेरर बर्डस्'?
हे पक्षी प्रामुख्याने उडू शकत नव्हते. मात्र, जमिनीवर अत्यंत वेगाने धावून हरणांसारख्या प्राण्यांची शिकार करत असत. या पक्ष्यांचे पूर्वज १० फूट उंच आणि ३०० किलोपेक्षा जास्त वजनाचे होते. ते आपल्या कुऱ्हाडीसारख्या वाकड्या चोचीने शिकार चिरडून टाकत असत. मात्र, आता सापडलेली नवीन प्रजाती आकाराने लहान असून, तिचे वजन साधारण ६ किलो (१३ पाैंड) होते. २५,००० वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे या पक्ष्यांचा सामना मानवाशी झाला असावा. शास्त्रज्ञांच्या मते, ३० लाख वर्षांपूर्वी उत्तर आणि दक्षिण अमेरिका जोडली गेल्यानंतर उत्तर अमेरिकेतून आलेल्या वाघ आणि लांडग्यांसोबतच्या स्पर्धेत हे मोठे पक्षी टिकू शकले नाहीत. मात्र, लहान आकाराचे टेरर बर्डस् स्वतःला वाचवण्यात यशस्वी ठरले. अखेर, हवामान बदल आणि जंगलांचे गवताळ प्रदेशात झालेले रूपांतर यामुळे या भीतीदायक पक्ष्यांचा पृथ्वीवरून शेवट झाला.