10 year old girl medical case | तब्बल 900 दिवसांनंतर मिटले दहा वर्षांच्या मुलीचे तोंड! File photo
विश्वसंचार

10 year old girl medical case | तब्बल 900 दिवसांनंतर मिटले दहा वर्षांच्या मुलीचे तोंड!

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : जरा कल्पना करा, एका 10 वर्षांच्या चिमुरडीचे तोंड सलग 900 दिवस उघडेच राहिले तर? न जेवता येणे, न बोलता येणे आणि सतत होणार्‍या वेदना... ही कोणत्याही पालकांसाठी काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे; पण कोलकाता येथील आर. अहमद डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे या मुलीला पुन्हा हसण्याचे बळ दिले आहे.

या मुलीला ‘अ‍ॅक्यूट डिसेमिनेटेड एन्सेफलोमायलाईटिस’ नावाचा एक अत्यंत दुर्मीळ आजार झाला होता. हा एक ‘ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर’ आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच मेंदू आणि मणक्यावर हल्ला करते. यामुळे या मुलीच्या जबड्यावर नियंत्रण ठेवणार्‍या नसा निकामी झाल्या आणि तिचे तोंड बंद करण्याची शक्तीच निघून गेली. मुलीच्या पालकांनी राज्यासह देशातील अनेक रुग्णालयांत उपचार घेतले; पण यश आले नाही. सुमारे अडीच वर्षांहून अधिक काळ तोंड उघडे राहिल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या : तोंड सतत कोरडे पडणे. जबड्याचे संतुलन बिघडणे.

सुप्रा-इरप्शन : दात वरच्या दिशेने अवाजवी वाढणे, ज्यामुळे तोंड बंद करणे अशक्य झाले होते. संसर्गाचा मोठा धोका. आर. अहमद डेंटल कॉलेजमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने एक विशेष मेडिकल बोर्ड स्थापन केला. तपासणीनंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की, दातांची वाढ इतकी झाली आहे की, ते काढल्याशिवाय जबडा बंद होणे शक्य नाही. नुकतीच ही शस्त्रक्रिया पार पडली असून, मुलीचे मागील बाजूचे दात काढण्यात आले. यामुळे 900 दिवसांनंतर प्रथमच या मुलीला आपले तोंड बंद करता आले. डॉक्टरांनी सांगितले की, ‘इतके दिवस तोंड उघडे राहिल्याने दात जागेवरून हालले होते. संसर्ग टाळण्यासाठी आणि कायमस्वरूपी नुकसान रोखण्यासाठी मागचे दात काढणे हाच एकमेव पर्याय होता. रुग्णालय प्रशासनाने ही केस ‘अत्यंत दुर्मीळ’ असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत न्यूरोलॉजी आणि डेंटल केअर या दोन्ही तज्ज्ञांची गरज असते. आता ही मुलगी पुन्हा बोलू शकणार आहे आणि स्वतःच्या हाताने जेवण घेऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT