लंडन : बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे जगभरात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, आता एका ताज्या संशोधनाने दिलासादायक माहिती समोर आणली आहे. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, दररोज केवळ 10 ते 12 मिनिटांचा वेगवान व्यायाम केल्याने आतड्याच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, इतकेच नाही तर हा व्यायाम कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासही मदत करतो.
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष
रक्तातील बदल : संशोधकांनी 30 निरोगी; परंतु वजन जास्त असलेल्या पुरुषांच्या रक्ताचे नमुने 10 मिनिटांच्या सायकलिंग आधी आणि नंतर तपासले. व्यायामानंतर रक्तामध्ये विशिष्ट प्रथिनांची वाढ झाल्याचे दिसून आले, जे कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास सक्षम असतात.
डीएनए रिपेअर : तीव्र व्यायामामुळे शरीरातील इंटरल्युकीन-6 (आयएल-6) नावाच्या घटकाची पातळी वाढते. हा घटक जळजळ कमी करतो आणि पेशींच्या डीएनएची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया वेगवान करतो.
कॅन्सरला प्रतिबंध : प्रयोगादरम्यान असे दिसून आले की, व्यायामानंतर तयार झालेले रक्त जेव्हा कॅन्सरच्या पेशींच्या संपर्कात आले, तेव्हा त्या पेशींची वाढ थांबली आणि सुमारे 1300 हून अधिक जनुकांमध्ये (जीन्स) सकारात्मक बदल झाले.
भारतीय संदर्भात महत्त्व
भारतात दरवर्षी आतड्याच्या कर्करोगाचे सुमारे 50,000 नवीन रुग्ण आढळतात. प्रामुख्याने कमी फायबरयुक्त आहार, लाल मांस आणि बसून राहण्याची जीवनशैली यामुळे हा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत, वेळ नाही असे म्हणणाऱ्यांसाठी 10 मिनिटांचा हा शॉर्ट वर्कआऊट एक प्रभावी उपाय ठरू शकतो.
काय करावा व्यायाम?
(10 मिनिटांचा प्लॅन)
संशोधक सुचवतात की, व्यायामाची तीव्रता अशी असावी जिथे तुम्हाला बोलणे कठीण होईल.
30 सेकंद : बर्पीज किंवा वेगाने पायऱ्या चढणे.
30 सेकंद : स्क्वॅटस् किंवा जंपिंग जॅक.
विश्रांती : 20 सेकंद. हे चक्र 4 ते 5 वेळा पुन्हा करा.
निष्कर्ष : नियमित व्यायामामुळे कॅन्सर परत येण्याचा धोका 28 टक्क्यांनी कमी होतो, तर जगण्याची शक्यता 37 टक्क्यांनी वाढते. त्यामुळे आजपासूनच आपल्या आरोग्यासाठी फक्त 10 मिनिटे काढण्यास सुरुवात करा, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.