चित्रकूट : संकट कोणतेही असो, आपली सर्व आशा देवावर असते. आपल्या देवतेवर अनेकांचा अगदी मनापासून विश्वास असतो. दैवाची कृपाद़ृष्टी आपल्यावर नेहमी असावी, असे प्रत्येक श्रद्धाळू व्यक्तीला वाटत असते. अनेक जण पायी वार्याही करतात. तासन्तास चालूनही लोकं दर्शनाची संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत, जर एका अशा मंदिराविषयी आणि अशा जागेविषयी सांगितलं, जिथे चोराची पूजा केली जाते, तर अर्थातच आश्चर्याचा धक्का बसेल. पण, वस्तुस्थितीही अशीच आहे. देशात एक असे धार्मिक स्थळ आहे, जिथे चोराची पूजा करण्यासाठी लोकांना लांब रांगांमध्ये उभे राहावे लागते आणि त्यानंतरच दर्शन प्राप्त होते. ते मंदिर आहे चित्रकूटच्या गुप्त गोदावरीमध्ये असलेल्या रामायण काळातील खटखटा चोराचे मंदिर!
असे म्हणतात की, चित्रकूटच्या गुप्त गोदावरीमध्ये असलेल्या खटखटा चोराची पूजा केल्यास सर्व समस्यांपासून मुक्ती तर मिळतेच. शिवाय, इथे दर्शन घेणार्या भक्तांच्या घरात चोरी होत नाही, अशीही श्रद्धा आहे. इथे खटखटा चोर नावाच्या राक्षसाची मूर्र्ती आहे. हे नाव ऐकूनही भाविकांची गर्दी कमी होत नाही. देव-देवतांचे जीवन कठीण करणार्या राक्षसाची पूजा कशी आणि का केली जाते, हे ऐकून आश्चर्य वाटले असेल. पण, भक्तांसाठी हा खटखटा चोर देवापेक्षा कमी नाही.
अशी श्रद्धा आहे की, खटखटा चोराला पूजेचा आशीर्वाद खुद्द प्रभू श्रीरामांनी दिला होता. ही गोष्ट त्रेता युगातील आहे. जेव्हा वनवासात प्रभू राम चित्रकूटला पोहोचले, तेव्हा त्यांना अनेक राक्षसांचा सामना करावा लागला. त्यातील एक राक्षस होता मयंक. स्कंद पुराणानुसार, एकदा सीता मातेने गोदावरी नदीत स्नान करत असताना, मयंक राक्षसाने तिची दिव्य वस्त्रे चोरली. ही वस्त्रे सती अनुसयाने सीता मातेला दिली होती. वस्त्रे चोरीला गेल्यामुळे सीता माता खूप दुःखी झाली. लक्ष्मणाने त्या राक्षसाचा पाठलाग केला आणि त्याच्यावर असा बाण मारला की, तो दगड बनू लागला. मयंकला त्याची चूक कळली. त्याने रामाकडे क्षमा मागितली. त्याच्या प्रार्थनेने राम द्रवले. प्रभू रामाने त्याला आशीर्वाद दिला की, कलियुगात भक्तांचे पाप नष्ट करणारा देव म्हणून तुझी पूजा केली जाईल.
रामाच्या आशीर्वादानंतर, खटखटा चोराची ही मूर्ती पापमोचनी शिला म्हणून ओळखली जाऊ लागली. पाप नष्ट करण्याच्या विशेष वैशिष्ट्यामुळे, या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. ही मूर्ती गुहेतील दगडांमध्ये अशा प्रकारे अडकली आहे की, ती हलवता येते. त्यामुळेच तिला खटखटा चोर म्हणतात. असे म्हणतात की, प्रभू रामांच्या तपस्थली चित्रकूटमध्ये, अडचणीत सापडलेल्या लोकांना शांती मिळते, ते राक्षस असले तरीही. प्रभू रामांची हीच महिमा आहे, की इथे राक्षससुद्धा पापांचे नाश करणारे बनतात. जेव्हा प्रभू श्रीराम आणि सीता चित्रकूटला पोहोचले, तेव्हा नाशिकहून गोदावरी नदी त्यांच्या दर्शनासाठी एका गुहेत गुप्तपणे प्रकट झाली आणि प्रभू राम आणि जानकीला दर्शन दिले. आजही गोदावरी या गुहेत गुप्तपणे वाहते. थोडे पुढे गेल्यावर ती अद़ृश्य होते. त्यामुळेच तिला ‘गुप्त गोदावरी’ म्हणतात.