नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात, जिथे सोशल मीडिया आणि चॅटबॉटस् प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार असतात, तिथे एक नवीन आणि अत्यंत चिंताजनक ट्रेंड समोर येत आहे. शाळा आणि रुग्णालयांमधील तज्ज्ञांनी धोक्याची सूचना दिली आहे की, तरुण आणि किशोरवयीन मुले भावनिक आधारासाठी ‘एआय’ चॅटबॉटस्कडे वेगाने वळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
एकटेपणामुळे मुले ‘एआय’ कडे आकर्षित होत असून, या डिजिटल आधाराचे व्यसन मुलांमध्ये असुरक्षितता आणि एकटेपणा वाढवत आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, ‘आजकाल मुलांना वाटू लागले आहे की, त्यांचा स्मार्टफोन हीच त्यांची सर्वात सुरक्षित आणि खासगी जागा आहे. जेव्हा त्यांचे ऐकायला कोणी नसते, तेव्हा ते चॅटजीपीटीवर आपल्या मनातल्या गोष्टी बोलू लागतात.’ त्यांच्या मते, मुलांना वाटते की ही एक भावनिक जागा आहे, जी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देते. चॅटजीपीटीसारखे ‘एआय’ चॅटबॉटस् अनेकदा ‘शांत व्हा, आपण मिळून यावर मार्ग काढू,’ असे प्रतिसाद देतात.
यामुळे मुलांना भावनिक आधार आणि मान्यतेचा भ्रम निर्माण होतो. ही ‘मान्यता मिळवण्याची सवय’ (Validation- Seeking Behavior) पालक आणि मुलांमधील संवादाच्या अभावाचा परिणाम आहे. त्या म्हणाल्या, ‘आता मुलांचे खरे मित्र कमी झाले आहेत आणि ते सोशल मीडियावर मिळालेल्या ‘लाईक्स’च्या संख्येवरून स्वतःचे मूल्य ठरवत आहेत. फोटोला 100 लाईक्स मिळाले नाहीत, तर त्यांना स्वतःला नाकारल्यासारखे वाटते.’ जेव्हा एखादी नकारात्मक भावना किंवा भावनिक असंतुलन ‘एआय’सोबत शेअर केले जाते, तेव्हा तो त्यालाच मान्यता देतो. यामुळे मुलांमध्ये भ्रम निर्माण होतो आणि चुकीच्या कल्पना मनात अधिक घट्ट बसतात. या स्थितीला तज्ज्ञांनी ‘अटेंशन बायस’ आणि ‘मेमरी बायस’ असे म्हटले आहे. त्यांनी इशारा दिला की, सतत असे घडल्यास तरुण पिढी सामाजिक कौशल्ये गमावून बसते आणि वास्तविक जीवनातील संवादापासून दूर जाते.