File Photo
विश्वसंचार

भारतीय उपखंडाखालील टेक्टॉनिक प्लेट दुभंगतेय?

संशोधकांचे मत

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सध्या आफ्रिकेत आदेनच्या आखातापासून खाली झिम्बाब्वेपर्यंत तीन हजार किलोमीटरपर्यंत एक लांब-रुंद भेग पडत आहे. जमीन दुभंगून आफ्रिकेचा हा भाग भविष्यात वेगळा होऊन एक नवा खंड बनू शकतो. या भेगेदरम्यान नवा समुद्रही बनू शकतो. भारतीय उपखंडाच्या खालीही टेक्टॉनिक प्लेटस्च्या अशाच हालचाली सुरू असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

याठिकाणी युरेशिया आणि भारतीय टेक्टॉनिक प्लेटस् धिम्या गतीने एकमेकींना धडकत आहेत. सहा कोटी वर्षांपूर्वी ही भूगर्भीय धडक सुरू झाली होती. या धडकेनेच हिमालयासारखा उत्तुंग पर्वत निर्माण झाला. एका नव्या संशोधनानुसार भारतीय प्लेट तुटू लागली आहे. लाखो वर्षांपूर्वी आफ्रिका खंड आशिया खंडापासून तुटून वेगळा झाला होता. आता असाच प्रकार पुन्हा भारताबाबत घडतो काय, असा प्रश्न आहे.

युरेशियन आणि भारतीय प्लेटांदरम्यानच्या धडकेबाबत वैज्ञानिक दीर्घकाळापासून संशोधन करीत आहेत. सागरी प्लेटस्च्या विपरित भारतीय प्लेटसारख्या महाद्विपीय प्लेटस् पृथ्वीच्या मेंटलमध्ये बुडण्याचा विरोध करतात. नव्या संशोधनानुसार भारतीय प्लेटचा काही भाग वेगळा होऊ शकतो. या सिद्धांताला भूकंपलहरी आणि तिबेटच्या झर्‍यांमधून मिळालेल्या वायूच्या नमुन्यांच्या डेटाने पुष्टी केली आहे. हेलियम आयसोटोप्सने संकेत दिला आहे की, प्लेट वेगळी झाल्यावर मेंटल खडकवर येत आहेत. उष्ण मेंटल सामग्री या अलगीकरणामुळे निर्माण झालेली पोकळ जागा भरू शकते.

युटेक्ट युनिव्हर्सिटीतील जियोडायनॅमिसिस्ट डोव्ह व्हॅन यांनी सांगितले की, महाद्वीपांबाबत कशा घटना घडू शकतात, हे आम्ही नव्याने पाहत आहोत. या क्षेत्रातील टेक्टॉनिक हालचाली आणि भूकंपाचे धोके नवी माहिती प्रदान करीत आहेत. भारतीय प्लेटमध्ये वेगवेगळी जाडी आणि संरचनेमुळे अनेक भेगा पडलेल्या आहेत. भूतानजवळील एका प्रमुख क्षेत्रातही भेगेचे पुरावे मिळाले आहेत. त्यामध्ये कदाचित मेंटलचे खडक रिकाम्या जागेत वाहत आहेत. भूकंप लहरींच्या मॅपिंगमधून दिसून आले की, पृष्ठभागाखाली वेगवेगळे ‘डाग’ दिसत आहेत. त्यावरून असे दिसते की, प्लेटचे काही भाग वेगळे झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT