Gemini Spark Cloud | कॉम्प्युटर बंद असतानाही 24 तास करणार तुमची कामे 
विश्वसंचार

Gemini Spark Cloud | कॉम्प्युटर बंद असतानाही 24 तास करणार तुमची कामे

गुगलने लाँच केले जेमिनी स्पार्क क्लाऊड एआय एजंट!

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : गुगलने आपल्या ‘गुगल आय/ओ 2026’या वार्षिक परिषदेत तंत्रज्ञान विश्वाचे लक्ष वेधून घेणारी एक मोठी घोषणा केली आहे. गुगलने ‘जेमिनी स्पार्क’ हे नवीन क्लाऊड-आधारित पर्सनल एआय एजंट लाँच केले आहे. हे एआय एजंट 24/7 म्हणजेच सतत बॅकग्राउंडमध्ये काम करण्यासाठी डिझाईन केले असून, युझरचा फोन किंवा कॉम्प्युटर बंद असला तरीही ते क्लाऊडवर आपली कामे सुरूच ठेवेल. पुढील आठवड्यापासून अमेरिकेतील सबस्क्राइबर्ससाठी हे फिचर रोलआऊट केले जाणार आहे.

डिव्हाईस बंद तरी काम सुरू! कसे काम करते स्पार्क?

आतापर्यंतचे एआय बॉटस् युझरने कमांड दिल्यावरच काम करायचे, पण जेमिनी स्पार्क हे गुगल क्लाऊडच्या व्हर्च्युअल मशिन्सवर चालणारे स्वतंत्र एजंट आहे. हे स्पार्क मल्टी-स्टेप टास्क करते. एकापेक्षा जास्त टप्प्यांची गुंतागुंतीची कामे स्वतःहून करू शकते. स्पार्कची गुगल वर्कस्पेसशी कनेक्टिव्हिटी आहे. तेे तुमच्या जीमेल, गुगल डॉक्स, शीटस् आणि कॅलेंडरशी पूर्णपणे कनेक्टेड असेल. गुगलने यासाठी ओपन इंटिग्रेशन्स दिले असून, कॅनव्हा, ओपनटेबल, इन्स्टाकार्ट, अ‍ॅडोबी, असाना आणि ड्रॉपबॉक्स यांसारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा वापर करून हे एआय एजंट तुमची कामे पूर्ण करेल. तसेच मॅक (मॅकओएस) युझर्ससाठी जेमिनी अ‍ॅपद्वारे लोकल फाईल्स अ‍ॅक्सेस करण्याची सुविधाही दिली आहे.

पैशांच्या व्यवहारांसाठी विशेष एपी-2 सुरक्षा नियम

एआय एजंटने युझरच्या बँक खात्यातून अवाजवी पैसे खर्च करू नयेत, यासाठी गुगलने एजंट पेमेंट प्रोटोकॉल (एपी-2 : एजंट पेमेंट प्रोटोकॉल) लागू केला आहे. या प्रोटोकॉलमुळे युझर एआय एजंटसाठी पेमेंटची एक ठराविक मर्यादा (लिमिट) सेट करू शकतात. तसेच खरेदी करताना कोणत्या व्यापार्‍यांशी व्यवहार करायचा आणि कोणत्या नाही, याचे नियम ठरवता येतील. प्रत्येक मोठ्या व्यवहारापूर्वी हे एआय युझरची परवानगी (अ‍ॅप्रुव्हल) मागेल.

सुविधा की डेटा प्रायव्हसीचा धोका?

गुगलचे हे पाऊल सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणार्‍या ओपनक्लॉ या सेल्फ-होस्टेड एआय प्रोजेक्टला मोठे आव्हान मानले जात आहे. ओपनक्लॉने गिटहबवर 3 लाख स्टार्स पार केले आहे. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि मासिकाने यावर डेटा प्रायव्हसीची चिंता व्यक्त केली आहे. तुमचे इनबॉक्स वाचणे, फाईल्स तपासणे आणि स्वतःहून पेमेंट करणे यांसारखे अधिकार एकाच कंपनीच्या क्लाऊड एजंटला देणे कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, सर्वसामान्य युझर्ससाठी कोणत्याही अतिरिक्त हार्डवेअरशिवाय 24 तास काम करणारे हे एआय साधन अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT