खार्तूम (सुदान) : नाईल नदीच्या खोऱ्यात 1,400 वर्षांपूर्वी अवघ्या 18 महिने वयाच्या बालकांच्या चेहऱ्यावर ‘टॅटू’ (गोंदण) काढले जात असल्याचा खळबळजनक खुलासा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केला आहे. सुदानमध्ये सापडलेल्या जतन केलेल्या मृतदेहांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ मिसूरी-सेंट लुईस’ येथील पुरातत्त्व शास्त्रज्ञ ॲनी ऑस्टिन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. संशोधकांनी आधुनिक सुदानमधील तीन ठिकाणांहून 1,048 जतन केलेल्या मानवी अवशेषांची तपासणी केली. यात सर्व वयोगटातील आणि स्त्री-पुरुषांसह 27 लोकांच्या शरीरावर टॅटूचे पुरावे सापडले. ‘कुलुबनार्टी’ येथील दफनभूमीतील मृतदेहांचा अभ्यास करण्यासाठी ‘इन्फ्रारेड’ प्रकाशाचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे उघड्या डोळ्यांना न दिसणारे जुने आणि पुसट झालेले टॅटू स्पष्टपणे दिसू शकले.
संशोधनात असे आढळले की, टॅटू असलेल्या बहुतांश व्यक्ती या 11 वर्षांखालील मुले होती. यात सर्वात लहान मूल अवघ्या 18 महिन्यांचे होते. साधारणपणे पुरातन काळात टॅटू हे प्रौढांच्या शरीरावर आढळतात; मात्र मुलांवर टॅटू असणे ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे. संशोधकांना आणखी एक विशेष गोष्ट आढळली, ती म्हणजे बहुतेकांच्या शरीराऐवजी कपाळ, कानशील, गाल किंवा भुवयांवर टॅटू काढले होते.
एका 3 वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर तर एका टॅटूवर दुसरा टॅटू गोंदवल्याचे आढळले, ज्यावरून लहान मुलांना वारंवार गोंदवले जात असावे, असे स्पष्ट होते. मानवी संस्कृतीत टॅटू काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. ‘ओत्झी द आईसमॅन’ या 5,300 वर्षांपूर्वीच्या माणसाच्या देहावर 61 टॅटू आहेत. 5,000 वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन ममी, 2,300 वर्षांपूर्वीच्या सैबेरियन ममी आणि 1,200 वर्षांपूर्वीच्या पेरुआन ममींमध्येही टॅटू आढळले आहेत. मात्र, सुदानमधील हा शोध लहान मुलांवरील टॅटूमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.