मॉस्को : रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात बुधवार, दि. 30 जुलै रोजी सकाळी झालेल्या 8.8 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाने जपानपासून अमेरिकेपर्यंत संपूर्ण पॅसिफिक महासागरात खळबळ उडवून दिली आहे. या महाभूकंपानंतर समुद्रात त्सुनामीच्या उंच लाटा उसळल्या असून, त्या रशियाच्या कुरील द्वीपसमूह आणि जपानच्या उत्तरेकडील होक्काइडो बेटापर्यंत पोहोचल्या आहेत. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) भूकंपाची तीव्रता 8.8 असल्याचे सांगितले आहे, जो 1952 नंतर या प्रदेशातील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे. या घटनेमुळे ‘जपानी बाबा वेंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्या महिला भविष्यवेत्त्याच्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू असून, जुलैमध्ये मोठा भूकंप व पाठोपाठ त्सुनामी येण्याबाबतचे तिचे भाकीत खरे ठरल्याचे म्हटले जात आहे.
जपानमध्ये त्सुनामीच्या लाटा पोहोचल्यानंतर ही भविष्यवेत्ती महिला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला जपानी मांगा कलाकार आणि भविष्यवेत्त्या रियो तात्सुकी यांची भविष्यवाणी ऑनलाईन चर्चेत होती. ‘जपानची बाबा वेंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्या रियो तात्सुकी यांनी 1999 मध्ये लिहिलेल्या ‘द फ्यूचर आय सॉ’ या आपल्या पुस्तकात लिहिले होते की, ‘5 जुलै 2025 रोजी दक्षिण जपानजवळचा समुद्र उकळू लागेल.
’ त्या दिवशी कोणताही मोठा भूकंप झाला नाही, परंतु बुधवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात झालेल्या 8.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे लोकांना त्या भविष्यवाणीबद्दल पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे. रियो तात्सुकी यांची भविष्यवाणी नेमक्या तारखेऐवजी संपूर्ण महिन्यासाठी एक इशारा होता की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यापूर्वी, त्यांच्या 5 जुलैच्या भविष्यवाणीमुळे मोठ्या संख्येने लोकांनी आपली जपानची यात्रा रद्द केली होती, हे विशेष. यापूर्वीही त्यांची अनेक भाकिते खरी ठरलेली असल्याचे म्हटले जाते.