ताल सरोवर : बेटाच्या आत बेट आणि त्या बेटावरही सरोवर! Pudhari File Photo
विश्वसंचार

ताल सरोवर : बेटाच्या आत बेट आणि त्या बेटावरही सरोवर!

पुढारी वृत्तसेवा

मनिला : निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांपैकी एक असलेले फिलिपिन्समधील ताल सरोवर शास्त्रज्ञ आणि पर्यटकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरले आहे. हे केवळ एक ज्वालामुखी विवर सरोवर नाही, तर याची भौगोलिक रचना अत्यंत दुर्मीळ आणि चक्रावून टाकणारी आहे. विचार करा, एका बेटावर एक सरोवर, त्या सरोवरात पुन्हा एक बेट आणि त्या बेटावरही आणखी एक सरोवर! ही जगातील अशा काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे निसर्गाचा हा अनोखा खेळ पाहायला मिळतो.

युनेस्कोच्या मते, ताल सरोवराची रचना ‘एका बेटावरील सरोवरातील बेटावर असलेले सरोवर’ अशी आहे. ही रचना समजून घेण्यासाठी आपल्याला काही नावे लक्षात घ्यावी लागतील: लुझोन हे फिलिपिन्समधील सर्वात मोठे बेट आहे. ताल सरोवर हे सरोवर लुझोन बेटावर आहे. व्होल्कॅनो बेट हे बेट ताल सरोवराच्या मधोमध आहे. मुख्य विवर सरोवर हे लहान सरोवर व्होल्कॅनो बेटावर आहे. व्हल्कन पॉईंट हे एक छोटे बेट आहे, जे मुख्य विवर सरोवराच्या आत आहे. थोडक्यात, लुझोन बेटावर ताल सरोवर, त्यात व्होल्कॅनो बेट, त्यावर मुख्य विवर सरोवर आणि त्यात व्हल्कन पॉईंट बेट अशी ही अविश्वसनीय रचना आहे.

लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या महाभयंकर उद्रेकांनंतर ताल ज्वालामुखीचे मुख खचले आणि तिथे एका मोठ्या खड्ड्याची (कॅल्डेरा) निर्मिती झाली. कालांतराने समुद्राचे पाणी आजच्या पानसिपिट नदीच्या मार्गाने आत शिरले आणि ताल सरोवराची निर्मिती झाली. त्यामुळे सुरुवातीला हे सरोवर खार्‍या पाण्याचे होते आणि पश्चिम फिलिपिन्स समुद्राचाच एक भाग होते; परंतु 1754 मध्ये झालेल्या एका मोठ्या ज्वालामुखी उद्रेकाने सर्व चित्र पालटले.

या उद्रेकातून निघालेली राख आणि लाव्हारस पानसिपिट नदीत इतक्या मोठ्या प्रमाणात साचला की, सरोवराचा समुद्राशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. यानंतर केवळ पावसाचे पाणी साचल्याने हळूहळू हे खार्‍या पाण्याचे सरोवर पूर्णपणे गोड्या पाण्याच्या सरोवरात रूपांतरित झाले. सरोवराचा समुद्राशी संपर्क तुटल्याने त्यात अडकलेल्या अनेक सागरी जीवांनी काळाच्या ओघात गोड्या पाण्याशी जुळवून घेतले किंवा त्यांच्यात उत्क्रांती होऊन नवीन प्रजाती निर्माण झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT