Taklamakan Desert carbon sink | टाकलामाकन वाळवंटाचे रूपांतर आता ‘कार्बन सिंक’मध्ये 
विश्वसंचार

Taklamakan Desert carbon sink | टाकलामाकन वाळवंटाचे रूपांतर आता ‘कार्बन सिंक’मध्ये

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनमध्ये राबवण्यात आलेल्या व्यापक वृक्षारोपण मोहिमेमुळे जगातील सर्वात मोठ्या आणि कोरड्या वाळवंटांपैकी एक असलेल्या टाकलामाकन वाळवंटाचे रूपांतर आता ‘कार्बन सिंक’मध्ये होत असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. याचा अर्थ असा की, हे क्षेत्र आता वातावरणात कार्बन उत्सर्जित करण्यापेक्षा जास्त प्रमाणात तो शोषून घेत आहे.

टाकलामाकन वाळवंट सुमारे 1,30,000 चौरस मैल (3,37,000 चौरस किलोमीटर) परिसरात पसरलेले आहे. हे वाळवंट उंच पर्वतरांगांनी वेढलेले असल्याने येथे बाष्पयुक्त हवा पोहोचू शकत नाही, ज्यामुळे हे अत्यंत कोरडे आणि वनस्पतींसाठी कठीण क्षेत्र मानले जात असे. मात्र, गेल्या काही दशकांपासून चीनने या वाळवंटाच्या कडांना ‘जंगलाचे कुंपण’ घातले आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. ‘मानवी हस्तक्षेपामुळे अत्यंत विषम कोरड्या भूभागातील कार्बन शोषण्याची क्षमता प्रभावीपणे वाढवता येते, हे आम्ही पहिल्यांदाच सिद्ध केले आहे.

वाळवंटाचे रूपांतर कार्बन सिंकमध्ये करणे आणि वाळवंटीकरण रोखणे आता शक्य आहे,’ असे कॅल्टेक मधील प्राध्यापक आणि ‘नासा’च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ युक युंग यांनी स्पष्ट केले. 1950 च्या दशकात चीनमधील मोठ्या प्रमाणावरील शहरीकरण आणि शेतीच्या विस्तारामुळे या वाळवंटाचा आकार वाढू लागला होता. या समस्येवर मात करण्यासाठी 1978 मध्ये चीनने ‘थ्री-नॉर्थ शेल्टरबेल्ट प्रोग्राम’ (ज्याला ‘ग्रेट ग्रीन वॉल’ असेही म्हटले जाते) सुरू केला.

उद्दिष्ट : 2050 पर्यंत टाकलामाकन आणि गोबी वाळवंटाच्या कडेने अब्जावधी झाडे लावणे. कामगिरी : आतापर्यंत उत्तर चीनमध्ये 66 अब्जाहून अधिक झाडे लावली गेली आहेत. परिणाम:, 1949 मध्ये चीनमधील जंगलाचे प्रमाण 10 टक्के होते, जे आज 25 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. 2024 पर्यंत टाकलामाकन वाळवंटाला पूर्णपणे वनस्पतींच्या वेढ्याने सुरक्षित करण्यात आले आहे. संशोधकांच्या मते, या प्रयत्नांमुळे वाळूच्या ढिगार्‍यांचे सरकणे थांबले असून, जमिनीचा दर्जा सुधारण्यास मदत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT