सिडनी : जगाच्या विविध भागांमध्ये दिवाळी साजरी केली जाते, पण यावर्षी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहर एखाद्या ‘मिनी-इंडिया’ पेक्षा कमी नाही. सिडनीतील निरिम्बा फील्डस्पासून ते मार्सडन पार्कपर्यंतच्या गल्ल्या आकर्षक रोषणाईने लखलखल्या आहेत. प्रत्येक घराला रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, पणत्या आणि एलईडी सजावटीने सजवण्यात आले आहे. लोकांनी दारासमोर सुंदर रांगोळ्या काढून भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की, सिडनीची ही दिवाळी भारतालाही जणु मागे टाकत आहे. यावर्षी सिडनीमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती ‘फँटम स्ट्रीट’ या रस्त्याची. येथील दिवाळीची सजावट पाहून प्रत्येकजण थक्क झाला. या रस्त्यावरील 20 हून अधिक घरांनी ‘डिजिटल रामायण’ची थीम तयार केली होती. रस्त्याच्या सुरुवातीला लावलेला क्यूआर कोड स्कॅन करताच, प्रेक्षकांना एक डिजिटल गाईडेड टूर मिळतो. या टूरमध्ये भगवान रामाचा वनवास ते रावण वधापर्यंतची संपूर्ण कथा रोषणाईच्या माध्यमातून दाखवली जाते.
ही सजावट आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय परंपरेचा एक शानदार संगम ठरली आहे. ‘फँटम स्ट्रीट’वरील प्रत्येक घराला रामायणाचा एक-एक अध्याय दर्शवण्यासाठी सजवण्यात आले होते. कुठे सीता हरणाचे द़ृश्य आहे, तर कुठे लंका दहनाच्या एलईडी झलक दिसतात. स्थानिक लोकांनी अनेक आठवड्यांच्या मेहनतीने हा अद्भुत देखावा तयार केला, जेणेकरून प्रत्येक द़ृश्यातून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश झलकला पाहिजे. लोक दूरदूरवरून ही अनोखी थीम पाहण्यासाठी आले. ‘फँटम स्ट्रीट’वरील दिवाळी सजावटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.