Suspended Cliff Shop | हे दुकान आहे ३९३ फूट उंचीवर लटकलेले! 
विश्वसंचार

Suspended Cliff Shop | हे दुकान आहे ३९३ फूट उंचीवर लटकलेले!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर आपण सहजपणे कोणत्याही दुकानात जातो. मात्र, एखादे दुकान जर उंच पर्वतकड्यावर लटकलेले असेल तर?

चीनमध्ये असेच एक अफलातून दुकान आहे. चीनच्या हुनान प्रांतातील शिनियुझाई नॅशनल जिओलॉजिकल पार्कमध्ये जमिनीपासून ३९३ फूट उंचीवर एका सरळ उभ्या खडकावर लटकलेले लाकडाच्या छोट्या केबिनसारखे हे दुकान आहे. येथील कड्यावर गिर्यारोहण करीत असलेल्या साहसवीरांच्या सोयीसाठी हे दुकान सुरू केलेले आहे.

लाकडापासून तयार केलेली ही छोटी केबिन अवघ्या दोन स्क्वेअर मीटरची आहे. हे जगातील सर्वात धोकादायक दुकान मानले जाते. या दुकानापर्यंत पोहोचणे प्रत्येकासाठी शक्य नाही, कारण यासाठी तुम्हाला प्रोफेशनल ट्रेकिंग गियर आणि लोखंडी दोरांच्या मदतीने त्या उभ्या खडकावर चढावे लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे पोहोचण्यासाठीच सुमारे दीड तासाचा वेळ लागतो. जमिनीपासून तब्बल ३९३ फूट उंचीवर हे लाकडी दुकान हवेत लटकत आहे. या दुकानाची सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे (स्टाफ) धाडस. हे दुकान हवेत लटकलेले असल्यामुळे येथे शौचालयाची (टॉयलेट) कोणतीही सुविधा नाही.

तिथले कर्मचारी ड्युटीदरम्यान पाणी पिणे देखील टाळतात, जेणेकरून त्यांना वारंवार खाली उतरण्याची कसरत करावी लागू नये. विचार करा, स्वतःची तहान मारून इतरांची तहान भागवण्याचा हा संघर्ष खरोखरच कौतुकास्पद आहे. ते दररोज सकाळी जड सामान उचलून या दुकानापर्यंत चढून जातात. इतका संघर्ष असतानाही या दुकानातील वस्तूंच्या किमती अतिशय सामान्य आहेत. सहसा पर्यटन स्थळांवर वस्तू महाग असतात; पण येथे पाण्याची एक बाटली तुम्हाला फक्त २ आरएमबी म्हणजेच २८ रुपयांमध्ये मिळेल. जर तिथे कर्मचारी हजर नसेल, तर तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT