वॉशिंग्टन ः एखाद्या जोडप्याचे बाळ जी महिला आपल्या गर्भात वाढवून त्याला जन्म देते तिला ‘सरोगेट मदर’ म्हटले जाते. देवकी आणि वसुदेव यांच्या बलराम या मुलाला वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी हिने आपल्या उदरात वाढवून जन्म दिला होता, असे वर्णन श्रीमद् भागवतपुराणात आढळते. अशा अनेक रोहिणी सध्या जगभरात आहेत. मात्र, ध्यानीमनी नसताना कुणाच्या तरी चुकीमुळे असा प्रकार घडला तर? आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे आफ्रिकन-अमेरिकन बाळाला जन्म दिल्यानंतर एका श्वेतवर्णीय अमेरिकन महिलेने फर्टिलिटी क्लिनिकवर खटला दाखल केला. हे बाळ खरे तर एका कृष्णवर्णीय जोडप्याचे होते, जे त्यांना एका सरोगेट मदरच्या पोटात वाढवायचे होते. त्यांच्या भ्रुणाचे रोपण या महिलेच्या गर्भात चुकून करण्यात आले होते.
‘या धक्क्यातून मी कधीही सावरू शकणार नाही’, असं तिने म्हटलं आहे. क्रिस्टीना मुर्रे असे या 38 वर्षीय महिलेचे नाव आहे. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ आफ्रिकन-अमेरिकन असल्याचे तिला कळले. क्रिस्टीना आणि तिचा शुक्राणू दाता दोघेही गोरे आहेत. ‘मी आनंदी होते. मी आई झाले होते. बाळ खूप छान, सुंदर आणि दोषरहित होते. परंतु, हेदेखील स्पष्ट होते की, काहीतरी चुकलेले आहे,’ असे तिने क्लिनिकविरुद्ध खटल्याची घोषणा करताना सांगितले. अनोळखी जोडप्याच्या बाळासाठी नकळत सरोगेट बनल्याचा हा प्रकार झाला. यानंतर अमेरिकन महिलेने फर्टिलिटी क्लिनिकवर खटला दाखल केला, क्लिनिकमधील चुकांबद्दल चिंता व्यक्त केली. ‘या प्रकारामुळे मला जो मानसिक त्रास आणि भावनिक छळ झाला आहे, त्यातून मी कधीही सावरू शकणार नाही,’ असं तिने म्हटलं आहे.
या अमेरिकन महिलेने अनोळखी जोडप्याच्या बाळाला जन्म दिला आणि झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला त्याच्या जैविक पालकांना द्यावे लागले. क्रिस्टीना प्रसूत होऊन तिने मुलाला जन्म दिला आणि तिला कळले की ते मूल आफ्रिकन-अमेरिकन आहे. यामुळे तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. यामुळे बाळाला जन्म दिल्यानंतर, मुर्रेने अनुवांशिक चाचणीची (डीएनए टेस्ट) मागणी केली आणि तिला आढळले की, ती त्या मुलाशी अजिबात संबंधित नाही. ‘माझे बाळ अनुवांशिकद़ृष्ट्या माझे नाही, त्याला माझे रक्त नाही, परंतु तो नेहमीच माझा मुलगा राहील,’ असे क्रिस्टीनाने भावनिक होत सांगितले. तसेच, ‘मी या धक्क्यातून कधीही पूर्णपणे बरी होणार नाही किंवा यातून पूर्णपणे पुढे जाणार नाही. माझ्या मुलाची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत राहीन आणि तो कसा वाढत आहे, माणूस बनत आहे याबद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटत राहील,’ असे ती म्हणाली.
आपण जन्म दिलेले बाळ आपले नसल्याचे समजल्यावर मुर्रेने लगेचच फर्टिलिटी क्लिनिकला कळवले. तिथून मुलाच्या जैविक पालकांना माहिती देण्यात आली. त्यांनी बाळाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आणि बाळ काही महिन्यांचा झाल्यानंतर मुर्रेने स्वेच्छेने बाळाला त्याच्या माता-पित्यांकडे सोपवण्यासाठी स्वतःचा त्याच्यावरील हक्क सोडून दिला. ‘तिने पहिल्यांदा तिच्या बाळाला पाहिले, तेव्हा तिला बसलेला धक्का तिला स्पष्टपणे आठवतो. क्रिस्टीना ही एक कॉकेशियन महिला आहे. तिने तिच्यासारख्याच असणार्या शुक्राणू दात्याची निवड केली. मात्र, तिने जन्म दिलेले बाळ आफ्रिकन-अमेरिकन होते. अशा चुका कधीही प्रजनन क्लिनिकमध्ये होऊ नयेत. हे खूप मोठे आणि भयंकर पाप आहे, असे तिच्या वकिलाने सांगितले.