Surprising Rebirth Star | ‘या’ तार्‍याचा होत आहे आश्चर्यकारक ‘पुनर्जन्म’ 
विश्वसंचार

Surprising Rebirth Star | ‘या’ तार्‍याचा होत आहे आश्चर्यकारक ‘पुनर्जन्म’

पुढारी वृत्तसेवा

लंडन : अंतराळातील सर्वात मोठ्या तार्‍यांपैकी एक मानला जाणारा ‘WOH G64’, ज्याला शास्त्रज्ञ प्रेमाने ‘बेहेमथ स्टार’ म्हणतात, त्याच्या विनाशाबद्दलची जुनी भाकिते चुकीची ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन अभ्यासानुसार, हा तारा मरणासन्न अवस्थेत नसून एका वेगळ्याच प्रक्रियेतून जात आहे. तो जणू काही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेत आहे. त्याचा चक्क ‘पुनर्जन्म’ होत आहे!

हा तारा पृथ्वीपासून सुमारे 1,63,000 प्रकाशवर्षे दूर ‘लार्ज मॅगेलॅनिक क्लाऊड’ या बटू आकाशगंगेत स्थित आहे. तो सूर्यापेक्षा साधारणत: 1,500 पट जास्त रुंद असून, विश्वातील सर्वात मोठ्या शोधलेल्या तार्‍यांपैकी एक आहे. याचे तेज आपल्या सूर्यापेक्षा 2,82,000 पट जास्त आहे. गेल्या काही वर्षांत ‘WOH G64’ तार्‍याचे तेज लक्षणीयरीत्या कमी झाले होते. जेव्हा एखादा ‘रेड सुपरजायंट’ तारा त्याचे बाहेरील वायूचे थर फेकून देतो आणि त्याचे तेज कमी होते, तेव्हा तो ‘सुपरनोव्हा’ स्फोटाच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे मानले जाते.

नोव्हेंबर 2024 मध्ये चिलीतील ‘व्हेरी लार्ज टेलिस्कोप’ने टिपलेल्या छायाचित्रात या तार्‍याभोवती वायू आणि धुळीचे ‘अंड्यासारखे कवच’ दिसले होते, ज्यामुळे शास्त्रज्ञांना वाटले की, हा तारा आता स्फोट होऊन संपणार आहे. मात्र, 7 जानेवारी रोजी ‘मंथली नोटीस ऑफ द रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाने हे चित्र पालटले आहे. दक्षिण आफ्रिकेतील ‘सॉल्ट’ टेलिस्कोपचा वापर करून शास्त्रज्ञांनी तार्‍याच्या वातावरणात ‘टायटॅनियम ऑक्साईड’ शोधले आहे. हे रसायन केवळ ‘रेड सुपरजायंट’ तार्‍यांमध्येच आढळते. याचा अर्थ असा की, तार्‍याने त्याचे स्वरूप बदललेले नाही.

यावर कील विद्यापीठाचे खगोल भौतिकशास्त्रज्ञ जॅको व्हॅन लून म्हणाले, ‘याचा अर्थ असा की, ‘WOH G64’ हा अजूनही ‘रेड सुपरजायंट’ आहे आणि तो कधीच बदलला नव्हता. आम्ही एका प्रकारे राखेतून झेप घेणार्‍या फिनिक्स पक्षाचा अनुभव घेत आहोत.’ या तार्‍याचे तेज कमी होण्यामागे त्याचा अंत हे कारण नसून त्याच्या जवळ असलेला एक छोटा आणि अद़ृश्य जोडीदार तारा असू शकतो. हा छोटा तारा मोठ्या तार्‍याचे बाह्य थर हळूहळू स्वतःकडे ओढून घेत असावा, ज्यामुळे हा महाकाय तारा ‘कॅनिबलाईज्ड’ (स्वतःच्याच जातीच्या घटकाकडून गिळंकृत) होत असल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT