नवी दिल्ली : भारतीय जेवणात, विशेषतः उत्तर भारतात ‘राजमा-चावल’ हा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. मात्र, राजमा केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही, तर तो आरोग्याचा खजिना मानला जातो. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असलेल्या राजम्याच्या सेवनाने शरीराला अनेक पोषक तत्त्वे मिळतात, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.
1. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत : जे लोक शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी राजमा हा प्रथिनांचा एक उत्कृष्ट पर्याय आहे. स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी राजमा अत्यंत फायदेशीर ठरतो.
2. वजन नियंत्रणात उपयुक्त : राजमामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे राजमा खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, परिणामी अतिप्रमाणत खाणे टाळले जाते. वजन कमी करू इच्छिणार्यांसाठी हा एक उत्तम आहार आहे.
3. रक्तातील साखर राहते नियंत्रित : राजमाचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी राजमाचे सेवन फायदेशीर मानले जाते.
4. हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक : राजमामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. हे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
5. पचनसंस्था सुधारते : यातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.
6. ऊर्जेचा खजिना : राजमामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि दिवसभर काम करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.