वॉशिंग्टन : फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर ‘सर्न’ नावाची एक प्रयोगशाळा आहे. त्यामध्ये ‘लार्ज हेड्रॉन कोलायडर’ हे महायंत्र असून त्यामध्ये सूक्ष्म कणांची धडक घडवली जात असते. तेथील अशाच एका महाप्रयोगातून ‘देवकण’ म्हणजेच ‘हिग्ज बोसॉन’ कणांचा शोध लागला होता. अंतराळात असे नैसर्गिक व सर्वात मोठे ‘पार्टिकल कोलायडर’ आहे. हे पार्टिकल कोलायडर म्हणजे ‘सुपरनोव्हा’. ज्यावेळी एखाद्या तार्याचा मृत्यू जवळ येतो त्यावेळी प्रचंड स्फोट होऊन त्यामधील घटक बाहेर उत्सर्जित केले जातात. या अतिशय प्रकाशमान घटनेलाच ‘सुपरनोव्हा’ असे म्हटले जाते. विश्वातील काही सर्वाधिक शक्तिशाली कण प्रवेगक (particle colliders) म्हणून सुपरनोव्हा कार्य करू शकता, पण केवळ एका अटीवर. स्फोट होण्याआधी त्या तार्यांनी मोठ्या प्रमाणात वायू गमावलेला असायला हवा, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे.
गेल्या जवळपास शंभर वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञ अंतराळातून पृथ्वीवर येणार्या उच्च-ऊर्जेच्या कणांचा (cosmic rays) शोध घेत आहेत. हे प्रामुख्याने प्रोटॉन्सपासून बनलेले असतात आणि क्वचितच त्यात जड मूलद्रव्यांचे नाभिके असतात. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि वायुमंडळ यापैकी बहुतेक किरणांना अडवतात, पण काही थेट आपल्या शरीरालाही भिडतात, दर सेकंदाला एक तरी किरण तुमच्यापर्यंत पोहोचतो! या कॉस्मिक किरणांची उर्जा श्रेणी खूप मोठी असते. त्यातले काही एक पेटा-इलेक्ट्रॉन व्होल्ट (PeV) पर्यंत जाऊ शकतात, म्हणजेच एक क्वॉड्रिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट, किंवा पृथ्वीवरील सर्वात मोठ्या अणु प्रवेगक लार्ज हॅड्रॉन कोलायडरपेक्षा हजारपट शक्तिशाली!
दुसर्या महाकाय तार्यांच्या स्फोटामुळे हे शक्तिशाली किरण तयार होतात, अशी खगोलशास्त्रज्ञांची जुनी समजूत होती. कारण या स्फोटांमध्ये आवश्यक सर्व घटक असतात, अफाट ऊर्जा, प्राथमिक कणांचा पूर आणि त्यांना उन्मत्त करून अंतराळात सोडणारी चुंबकीय क्षेत्रे, पण टायको आणि कॅसिओपिया ए सारख्या जवळच्या सुपरनोव्हा अवशेषांच्या निरीक्षणांमध्ये अपेक्षित प्रमाणात शक्तिशाली किरण आढळले नाहीत, जे संशोधकांना संभ—मात टाकणारे होते. आता, ‘अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार्या संशोधनात, वैज्ञानिकांनी सुपरनोव्हा-सिद्धांत वाचवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सुपरनोव्हा अवशेष खरंच PeV ऊर्जा निर्माण करू शकतात. अशा स्फोटांना ते PeVatron म्हणतात, पण त्यासाठी एक महत्त्वाची अट असते. स्फोट होण्याआधी तार्याने आपल्या वस्तुमानाचा किमान दोन सूर्याइतका भाग गमावलेला असायला हवा!