Saudi Arabia Silver Treasure | सौदीचे बुडालेले जहाज अन् १६ टन चांदीचा खजिना  
विश्वसंचार

Saudi Arabia Silver Treasure | सौदीचे बुडालेले जहाज अन् १६ टन चांदीचा खजिना

८२ वर्षांनंतरही ‘सिल्व्हर रियाल’चे रहस्य कायम!

पुढारी वृत्तसेवा

रियाध : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ओमानच्या समुद्रात बुडालेल्या ‘एसएस जॉन बॅरी’ या अमेरिकन जहाजाच्या अवशेषांमधून १ लाख नव्हे तर तब्बल १० लाखांहून अधिक चांदीचे सौदी ‘रियाल’ (नाणी) बाहेर काढण्यात आली आहेत. ५० वर्षांहून अधिक काळ समुद्राच्या तळाशी पडून असलेल्या या खजिन्याचे वजन सुमारे १६ टन असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, इतका मोठा खजिना बाहेर काढूनही या जहाजाशी जोडलेली अनेक रहस्ये आजही कायम आहेत.

हे अमेरिकन जहाज दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात (१९४४ मध्ये) सौदी अरबसाठी चांदीची नाणी घेऊन जात होते. सौदी सरकारच्या मागणीनुसार हे ‘सिल्व्हर रियाल’ अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे तयार करण्यात आले होते. सौदीमध्ये वेगाने वाढणाऱ्या तेल उद्योगातील कामगारांना वेतन देण्यासाठी ही नाणी पाठवली जात होती. ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’च्या एका जुन्या रिपोर्टनुसार, हा संपूर्ण माल इतका गुप्त ठेवण्यात आला होता की, जहाजावरील कर्मचाऱ्यांनाही त्यात काय आहे याची माहिती नव्हते. नोव्हेंबर १९४४ मध्ये एका जर्मन पाणबुडीने अरब सागरात ‘जॉन बॅरी’ जहाजावर टॉरपिडो क्षेपणास्त्राने भीषण हल्ला केला, ज्यामुळे हे जहाज समुद्राच्या तळाशी बुडाले. जहाजावरील ७० पैकी ६८ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले, तर दोघांचा मृत्यू झाला.

या जहाजासोबत तब्बल ३० लाख चांदीची नाणी समुद्रात गडप झाली होती. अखेर १९९४ च्या उत्तरार्धात एका विशेष शोधमोहिमेद्वारे अत्याधुनिक ड्रिलिंग जहाजे आणि उपकरणांच्या मदतीने १ मैल (सुमारे ५,००० फूट) खोल समुद्रात बुडालेल्या या जहाजाचा शोध घेण्यात आला. ऑक्टोबर १९९४ मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेत नोव्हेंबरच्या सुरुवातीला पहिल्यांदा चांदीची नाणी दिसून आली. पुढील अवघ्या ५ दिवसांत १३ लाख सौदी रियाल (सुमारे १७ टन वजनाची नाणी) बाहेर काढण्यात आले. हे ऑपरेशन जहाजाच्या केवळ एका भागापर्यंतच पोहोचू शकले. त्यामुळे मूळ शिपमेंटचा एक मोठा हिस्सा आजही समुद्राच्या तळाशीच पडून आहे. बाहेर काढण्यात आलेल्या या नाण्यांना धातूच्या मूल्यापेक्षा ऐतिहासिक महत्त्व जास्त प्राप्त झाले असून, लिलाव संस्था ‘सोथबी’ने या दुर्मीळ नाण्यांचा संपूर्ण संच एकत्र विकण्याची योजना आखली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT