विश्वसंचार

अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर सुनीता आनंदाने नाचली!

Arun Patil

वॉशिंग्टन : भारतीय वंशाची अंतराळ वीरांगना सुनीता विल्यम्स आता तिसर्‍यांदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचली आहे. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या या स्पेस स्टेशनमध्ये गेल्यावर सुनीताचा आनंदाने मुक्तपणे नाचत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अंतराळवीरांचे नवे पथक तिथे येताच तेथे राहत असलेले अंतराळवीर स्वागत करतात. त्यावेळी सुनीताने स्पेस स्टेशन हे आपले दुसरे घर आहे असे सांगत तिथे आनंदाने नाचण्यास सुरुवात केली!

सुनीताचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये स्पेस स्टेशनवर पोहोचल्यावर घंटा वाजते. वास्तविक, 'आयएसएस'ची परंपरा आहे की, जेव्हा जेव्हा एखादा नवीन अंतराळवीर तेथे येतो तेव्हा इतर अंतराळवीर घंटा वाजवून त्यांचे स्वागत करतात. सुनीता विल्यम्स यांनी 'आयएसएस'च्या सदस्यांना त्यांचे दुसरे कुटुंब मानले. त्या म्हणाल्या, 'आयएसएस माझ्यासाठी दुसर्‍या घरासारखे आहे.' त्यांनी सर्व अंतराळवीरांचे अप्रतिम स्वागताबद्दल आभारही मानले.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे अंतराळ यान प्रक्षेपणानंतर 26 तासांनी गुरुवारी रात्री 11.03 वाजता अंतराळ स्थानकावर पोहोचले. ते गुरुवारी रात्री 9.45 वाजता पोहोचणार होते, पण रिअ‍ॅक्शन कंट्रोल थ्रस्टरच्या समस्येमुळे पहिल्या प्रयत्नात ते डॉक करू शकले नाही. मात्र, दुसर्‍या प्रयत्नात यानाला स्पेस स्टेशनशी डॉकिंग करण्यात यश आले. बोईंगच्या स्टारलाइनर यानातून अंतराळात जाणारे हे दोन्ही अंतराळवीर पहिले अंतराळवीर ठरले आहेत. बुधवार, 5 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8.22 वाजता बोईंगचे स्टारलाईनर मिशन लाँच करण्यात आले.

फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून यूएलएच्या अ‍ॅटलस व्ही रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले. विल्मोर आणि विल्यम्स स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी सुमारे एक आठवडा स्पेस स्टेशनवर राहतील. बोईंगचे स्पेसक्राफ्ट एसयूव्ही-स्टारलाइनर डिझाइन करण्यातही सुनीताने मदत केली. हे यान 7 क्रू मेंबर्स घेऊन जाऊ शकते. अंतराळ यान तयार झाल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी यानाला 'कॅलिप्सो' असे नाव दिले. ही मोहीम यशस्वी झाल्यास, इतिहासात प्रथमच अमेरिकेकडे अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी दोन अंतराळ याने असतील. सध्या अमेरिकेकडे फक्त एलन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आहे. 2014 मध्ये नासाने स्पेसएक्स आणि बोईंगला स्पेसक्राफ्ट तयार करण्याचे कंत्राट दिले होते.

SCROLL FOR NEXT