बंगळूर : अंतराळात साचत चाललेला कचरा ही सध्या जागतिक स्तरावर चिंतेची बाब बनली आहे. मात्र, भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संघटनेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक माहिती समोर आणली आहे. ‘इस्रो’च्या एका नवीन अभ्यासानुसार, सूर्य आपल्या सक्रियतेद्वारे अंतराळातील जुने आणि निकामी झालेले सॅटेलाईट पृथ्वीकडे खेचून अंतराळ साफ करण्यास मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे.
विक्रम साराभाई अंतरीक्ष केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीमधील शास्त्रज्ञांनी प्रथमच हे सिद्ध केले आहे की, सूर्याचे 11 वर्षांचे सौर चक्र ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये असलेल्या कचर्याच्या उंचीवर थेट परिणाम करते. जेव्हा सूर्याची सक्रियता त्याच्या 11 वर्षांच्या चक्राच्या सुमारे 67 टक्क्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा कक्षेत फिरणारा कचरा अत्यंत वेगाने खाली येऊ लागतो. मुख्य लेखिका आयशा एम. अशरफ यांच्या मते, सूर्य जेव्हा जास्त सक्रिय असतो, तेव्हा पृथ्वीच्या जवळ असलेला अंतराळातील कचरा आपली उंची वेगाने गमावतो.
एका निश्चित स्तरानंतर ही प्रक्रिया अधिक वेगवान होते. टीमने 1960 च्या दशकात सोडलेल्या कचर्याच्या 17 तुकड्यांच्या गतीवर सलग 36 वर्षे (सौर चक्र 22 ते 24 दरम्यान) लक्ष ठेवले. हे तुकडे पृथ्वीपासून 600 ते 800 कि.मी. उंचीवर फिरत होते. जेव्हा सूर्य अतिशय सक्रिय असतो, तेव्हा त्यातून तीव्र अतिनील किरणे आणि प्रभारित कण बाहेर पडतात. यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचा वरचा थर, ज्याला ‘थर्मोस्फीयर’ म्हणतात, तो गरम होऊन विस्तारतो. यामुळे त्या उंचीवर हवेची घनता वाढते आणि तिथे फिरणार्या कचर्यावर घर्षण किंवा ओढ निर्माण होते. परिणामी, या कचर्याचा वेग मंदावतो आणि तो पृथ्वीच्या दिशेने खेचला जाऊन वातावरणात जळून नष्ट होतो.
शोध महत्त्वाचा का आहे?
पृथ्वीपासून 400 ते 2000 कि.मी. उंचीवर असलेला ‘लो अर्थ ऑर्बिट’ हा भाग सध्या सॅटेलाईटस्, रॉकेटचे अवशेष आणि जुन्या टकरींमुळे निर्माण झालेल्या तुकड्यांनी भरून गेला आहे. या भागात स्पेसएक्सचे स्टारलिंक नेटवर्क आणि अनेक हवामान उपग्रह कार्यरत आहेत. या कचर्याची एकाशी जरी टक्कर झाली, तर हजारो नवीन तुकडे तयार होऊन भविष्यातील मोहिमांना धोका निर्माण होऊ शकतो. ‘इस्रो’चा हा अभ्यास ‘फ्रंटियर्स इन अॅस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झाला असून, यामुळे भविष्यातील सॅटेलाईट मिशनचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.