Sun without sunspots | सूर्यावर अचानक शांतता : सलग काही दिवस डागविरहित 
विश्वसंचार

Sun without sunspots | सूर्यावर अचानक शांतता : सलग काही दिवस डागविरहित

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : गेल्या जवळजवळ चार वर्षांपासून तारुण्यातील मुरुमांप्रमाणे काळपट डागांनी (सनस्पॉट) भरलेला सूर्याचा चेहरा अचानक सलग काही दिवस गुळगुळीत किंवा डागविरहित झाला आहे. हे सूर्याची सक्रियता कमी होत असल्याचे लक्षण मानले जात होते. मात्र, सूर्य आता शांत झाला आहे, असे समजून गाफील राहणे धोक्याचे ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

‘स्पेस डॉट कॉम’च्या अहवालानुसार, 8 जून 2022 नंतर प्रथमच, रविवारी (दि. 22 फेब्रुवारी) पृथ्वीच्या दिशेने असलेल्या सूर्याच्या भागात एकही डाग (सनस्पॉट) दिसला नाही. या एका ‘डागविरहित दिवसामुळे’ सलग 1,335 दिवसांपासून सुरू असलेला डाग दिसण्याचा सिलसिला खंडित झाला. या काळात सूर्यावरील या काळपट डागांमधून धोकादायक सौर वादळ निर्माण होऊन ते पृथ्वीवर धडकण्याचा धोका सतत कायम होता. ‘स्पेसवेदर डॉट कॉम’नुसार, सोमवार (23 फेब्रुवारी) आणि मंगळवार (24 फेब्रुवारी) रोजीही सूर्यावर डाग नव्हते. मात्र, बुधवार (25 फेब्रुवारी) रोजी सूर्याच्या मागील बाजूस असलेले दोन डाग फिरून समोरच्या बाजूला आले, ज्यामुळे सौर वादळाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे.

सूर्य सध्या त्याच्या 11 वर्षांच्या चक्रातील ‘सोलर मॅक्सिमम’ टप्प्यातून नुकताच बाहेर पडला आहे. या काळात सूर्याच्या पृष्ठभागावर डागांचे प्रमाण सर्वाधिक असते आणि सतत सौर ज्वाला तसेच कोरोनल मास इजेक्शन होत असतात. अशा स्थितीत सूर्याचा चेहरा अचानक डागविरहित होणे आश्चर्यकारक मानले जात आहे. काही आठवड्यांपूर्वीच सूर्यावर सौर किरणोत्सर्गाची मोठी घटना घडली होती आणि या चक्रातील सर्वात स्फोटक डागही पाहण्यात आला होता, ज्यामुळे सध्याची स्थिती अधिक गोंधळात टाकणारी आहे.

सूर्याच्या या शांत चेहर्‍यावर विश्वास ठेवू नका, कारण सध्याचे चक्र (सोलर सायकल 25) अजून संपलेले नाही. सूर्य पूर्णपणे डागविरहित होण्यापूर्वी अंतराळातील हवामानाच्या आणखी काही घटना घडण्याची दाट शक्यता आहे. ‘सोलर सायकल 25 अजून कित्येक वर्षे सुरू राहणार आहे,’ असे ‘स्पेसवेदर डॉट कॉम’च्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. मात्र, हे डागविरहित दिवस आपल्याला सांगतात की सध्याचे चक्र हळूहळू कमी होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT