Summer health risks | उन्हाळ्यात उष्माघातासह ‘या’ समस्यांचाही धोका 
विश्वसंचार

Summer health risks | उन्हाळ्यात उष्माघातासह ‘या’ समस्यांचाही धोका

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टनः भारतासह संपूर्ण उत्तर गोलार्धात सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. याचे अत्यंत गंभीर परिणाम मानवी आरोग्यावरदेखील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. केवळ चक्कर येणे किंवा उष्माघात होणे इतपतच हे संकट मर्यादित राहिलेले नाही. प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक ‘दी लॅन्सेट’ मधील एका ताज्या लेखानुसार, वाढत्या तापमानामुळे मूतखडा आणि मूत्रमार्गाशी संबंधित संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शास्त्रज्ञांनी या परिस्थितीला ‘सायलेंट हेल्थ क्रायसिस’ असे संबोधले आहे.

प्रचंड उकाड्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी घाम जास्त येतो, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे लघवी अधिक दाट होते. यामुळे शरीरातील कॅल्शियम, युरिक अ‍ॅसिड आणि इतर घटक किडनीमध्ये ‘क्रिस्टल’च्या स्वरूपात साचू लागतात, ज्याचे पुढे मूतखड्यात रूपांतर होते. उष्ण आणि दमट हवामान जीवाणूंच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असते. विशेषतः महिला आणि वृद्धांमध्ये यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग वाढतो.

अमेरिकेच्या सिव्हिल डिफेन्स विभागाने देशभर सुरू असलेल्या उष्म्याच्या लाटेबद्दल गंभीर इशारा दिला आहे. उन्हाळ्यात नागरिक अनेकदा तहान लागली तरी पुरेसे पाणी पीत नाहीत. यामुळे मूत्राशयातील हानिकारक जीवाणू शरीराबाहेर फेकले जात नाहीत आणि संसर्गाचा धोका वाढतो. सध्या अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये उष्णतेचा किडनीच्या आरोग्यावर होणार्‍या दीर्घकालीन परिणामांवर सखोल संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांनी सुचविलेल्या खबरदारीच्या टिप्स ः पाणी पिण्याचे प्रमाण: दिवसाला किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. ही पेये टाळा : चहा, कॉफी आणि साखरयुक्त कोल्ड ड्रिंक्स पिणे कमी करा, कारण यामुळे शरीरातील पाणी आणखी कमी होते.

फळांचा आहारात समावेश : कलिंगड, संत्री, द्राक्षे यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा. वेळेचे नियोजन : दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा. लॅन्सेटमधील अहवालानुसार, ज्यांना आधीच किडनीचे विकार आहेत, मधुमेही रुग्ण आणि जे कडाक्याच्या उन्हात शारीरिक कष्टाची कामे करतात, त्यांना हा धोका सर्वाधिक आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास किडनी निकामी होण्यासारखे गंभीर प्रकारही घडू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT