‌Sugary Drinks 
विश्वसंचार

‌Sugary Drinks : ‘शुगरी ड्रिंक्स‌’मुळे किशोरवयीन मुलांमध्ये चिंतेचा धोका 34 टक्क्यांनी वाढला

नवीन संशोधनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : तरुण वय हे शारीरिक आणि मानसिक बदलांचा एक अत्यंत नाजूक टप्पा असतो. पालक सहसा आपल्या मुलांना लठ्ठपणा किंवा मधुमेहापासून वाचवण्यासाठी त्यांच्या आहारावर लक्ष ठेवतात. मात्र, त्यांच्या हातातील कोल्ड्रिंक, गोड कॉफी किंवा एनर्जी ड्रिंकचा कॅन त्यांच्या मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम करतोय, याचा विचार आपण कधी केला आहे का? एका नवीन संशोधनानुसार, साखरयुक्त पेयांचे (Sugary Drinks) अतिसेवन किशोरवयीन मुलांमध्ये ‌‘एंग्झायटी‌’ म्हणजेच चिंतेचा धोका 34 टक्क्यांनी वाढवते.

जगभरातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 10 ते 19 वर्षे वयोगटातील दर 7 पैकी 1 किशोरवयीन मुलगा (14.3 टक्के) कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येने त्रस्त आहे. दुर्दैवाने, या समस्या वेळेवर ओळखल्या जात नाहीत आणि त्यांच्यावर उपचारही होत नाहीत. 15 ते 29 वयोगटातील तरुणांच्या मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण ‌‘आत्महत्या‌’ हे आहे. बोर्नमाऊथ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेला हा अभ्यास ‌‘जर्नल ऑफ ह्यूमन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स‌’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनात अनेक जुन्या अभ्यासांच्या डेटाचे आणि सर्वेक्षणांचे विश्लेषण करण्यात आले. प्रमुख निष्कर्ष : ज्या मुलांनी साखरयुक्त पेयांचे अधिक सेवन केले, त्यांच्यात एंग्झायटीची लक्षणे 34 टक्क्यांनी जास्त आढळली. अभ्यासात समाविष्ट पेये : सोडा, एनर्जी ड्रिंक्स, गोड फळांचे रस, शेक्स, गोड चहा-कॉफी आणि फ्लेवर्ड मिल्क. या अभ्यासाच्या सहलेखिका डॉ. क्लो केसी यांच्या मते, आतापर्यंतचे बहुतांश आरोग्य उपक्रम हे खराब आहाराला केवळ लठ्ठपणा किंवा टाईप-2 मधुमेहाशी जोडून पाहत आले आहेत. मात्र, पोषक तत्त्वांचा अभाव असलेल्या आणि केवळ कॅलरी देणाऱ्या पेयांचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, साखरयुक्त पेये आणि अँक्झायटीची लक्षणे यांचा थेट संबंध दिसून आला आहे. जरी हे संशोधन पूर्णपणे हे सिद्ध करत नसले की केवळ ही पेयेच चिंतेचे एकमेव कारण आहेत, तरीही त्यांच्यामुळे धोका वाढतो हे निश्चित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT