Brain Eating Amoeba | 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गावर होणार यशस्‍वी उपचार 
विश्वसंचार

Brain Eating Amoeba | 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गावर होणार यशस्‍वी उपचार

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अत्यंत दुर्मीळ आणि ९७ टक्क्यांहून अधिक मृत्यूदर असलेल्या 'मेंदू खाणाऱ्या अमिबा' (ब्रेन इटिंग अमिबा) या जीवघेण्या आजारावर शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी नवीन औषधे आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वी उपचार शोधण्यास सुरुवात केली आहे. 'लाईव्ह सायन्स'ने प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालानुसार, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रांमुळे या घातक संसर्गातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्याची सकारात्मक चिन्हे आहेत.

काय आहे हा संसर्ग आणि त्याचा धोका?

'नेग्लेरिया फोवलेरी नावाचा हा एककोशिय जीव (अमिबा) प्रामुख्याने तलाव, नद्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यांसारख्या गोड्या पाण्यात आढळतो. पोहताना किंवा डुबकी मारताना हा अमिबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. तिथे तो मेंदूच्या उती (टिश्‍यू) नष्ट करू लागतो, त्‍याला वैद्यकीय भाषेत 'प्राथमिक अमिबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस' (पीएएम) म्हणतात. हा संसर्ग इतका वेगवान असतो की, लक्षणे दिसू लागल्यानंतर अवघ्या ५ ते १८ दिवसांत रुग्णाचा मृत्यू होतो. वैद्यकीय आकडेवारीनुसार, या संसर्गाची लागण झालेल्या १०० पैकी केवळ ३ ते ४ रुग्णच जिवंत वाचू शकले आहेत.

नवीन उपचार पद्धती आणि आशादायक यश

पारंपरिक उपचारांना मर्यादा असल्याने आता डॉक्टर नवीन औषधांचा आणि क्लिनिकल पद्धतींचा अवलंब करत आहेत. यामध्ये कॅन्सर आणि इतर संसर्गांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांचे नवीन मिश्रण रुग्णांना दिले जात आहे. याशिवाय, मेंदूची सूज कमी करण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित राखण्याचे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या काही प्रकरणांमध्ये या नवीन उपचारांमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. संसर्गाचे वेळेत निदान झाल्यास आणि ही नवीन औषधे त्वरित सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. हवामान बदलामुळे जगभरात पाण्याचे तापमान वाढत असल्याने या अमिबाचा धोका वाढत आहे; अशा वेळी हा वैद्यकीय शोध अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT