कॅलिफोर्निया : आजकाल अगदी छोट्या-मोठ्या शहरातही ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण होत चालली आहे. एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे असताना ट्रॅफिक लागले तर आपली काय स्थिती होते, याचा अनुभव जवळपास प्रत्येक व्यक्तीने घेतलेला असतो. अशा परिस्थितीत आपले कार टॅफिकमध्ये अडकले असेल आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी रस्त्यावरून ती कार थेट हवेत झेपावत काही कार पार करून पुन्हा खाली उतरत असेल तर त्याची बातच न्यारी! पण, ही केवळ कवीकल्पना नाही तर ते प्रत्यक्षात उतरते आहे. सध्या अॅलेफ एरोनॉटिक्सने त्यांच्या उडणार्या कारची यशस्वी चाचणी केली आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये, असे दिसून येते की, एक काळी कार काही क्षणांसाठी रस्त्यावरून उड्डाण करते आणि दुसर्या कारसमोर उतरते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, तुम्हाला येत्या काळात आकाशात कार कशा उडताना दिसतील हे कळेल. कॅलिफोर्नियाच्या कार बनवणार्या कंपनीने साय-फाय कारचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ही कार कंपनी 2015 मध्ये सुरू झाली आणि तिचे मुख्य कार्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहे. या कंपनीने स्वतः या उडणार्या कारच्या चाचणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही कंपनी उडणार्या कार डिझाईन करण्यासाठी ओळखली जाते.
एक्सवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला केवळ दोन दिवसांत 4.2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या, ही कार 25 मैल प्रति तास वेगाने धावू शकते. यात समोर चार रोटर आणि मागे चार रोटर आहेत. त्याची किंमत सुमारे 2.6 कोटी रुपये आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, लॉन्च होण्यापूर्वीच त्याची बुकिंग सुरू झाली आहे. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक बुकिंग झाली आहेत. दरम्यान, या व्हिडीओला बर्याच मिश्किल प्रतिक्रियाही येत आहेत. काही युजर्सनी हा एआयने बनवलेला व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे तर काही युजर्सनी हे कार डिझाइनचे ड्रोन आहे जे मोठ्या आकारात बनवले आहे, असेही म्हटले आहे.