वॉशिंग्टन : बहुतांश पुरातत्त्वशास्त्रज्ञ हे प्राचीन संस्कृतींचा इतिहास समजून घेण्यासाठी भूतकाळात मानवाने मागे सोडलेल्या वस्तूंचा अभ्यास करतात. मात्र, आताचे संशोधक याच पुरातत्त्वशास्त्रीय तंत्रांचा वापर आधुनिक आणि अत्यंत आव्हानात्मक किंवा प्रतिकूल पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी करत आहेत. मानव अत्यंत कठीण परिस्थितीत कसा जिवंत राहतो, याबद्दलची नवीन माहिती याद्वारे समोर येत आहे. त्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक तसेच एव्हरेस्ट या हिमालयातील सर्वोच्च शिखरावरील चक्क कचऱ्याचा अभ्यास करण्यात येत आहे.
कॅलिफोर्नियातील चॅपमन युनिव्हर्सिटीचे पुरातत्वशास्त्रज्ञ जस्टिन वॉल्श हे ‘स्पेस आर्किऑलॉजी’ म्हणजेच अंतराळ पुरातत्त्वशास्त्र या क्षेत्रातील अग्रदूत आहेत. पृथ्वीपासून १०० किलोमीटर किंवा त्याहून अधिक उंचीवर होणाऱ्या मानवी हालचालींचा अभ्यास यात केला जातो. २०१५ मध्ये सुरू झालेल्या ‘आयएसएस आर्किऑलॉजिकल प्रोजेक्ट’ अंतर्गत वॉल्श हे अंतराळवीर ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर’ (आयएसएस) कसा वेळ घालवतात आणि राहतात, याचा अभ्यास करत आहेत. २०२३ मध्ये कॅनडाच्या कार्लेटन युनिव्हर्सिटीचे डिजिटल पुरातत्त्वशास्त्रज्ञ शॉन ग्रॅहम देखील या प्रकल्पात सामील झाले. आता वॉल्श आणि ग्रॅहम यांनी एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे, ज्याचे नाव आहे ‘आर्किऑलॉजी इम्पॉसिबल’. या प्रकल्पांतर्गत ते माऊंट एव्हरेस्टवर मानवाने मागे सोडलेल्या वस्तू आणि कचऱ्याचा अभ्यास करणार आहेत.
पृथ्वीवरील सर्वात उंच आणि कठीण ठिकाणांवर विजय मिळवण्याचा माणसाला इतका ध्यास का आहे, याची या दोन्ही तज्ज्ञांनी माहिती दिली. संशोधकांनी सांगितले की, नासाने अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांचे हजारो डिजिटल फोटो सार्वजनिक केले आहेत. या फोटोंचा वापर करून संशोधकांनी अंतराळवीर तिथे कोणत्या वस्तू, साधने वापरतात आणि कसे राहतात याचा अभ्यास केला. उदाहरणार्थ, नासाने आयएसएसवर ‘मेन्टेनन्स वर्क एरिया’ (दुरुस्तीचे ठिकाण) नावाचा एक भाग तयार केला होता. पण पुरातत्त्वशास्त्रीय अभ्यासातून असे दिसून आले की, अंतराळवीर त्या जागेचा वापर दुरुस्तीऐवजी बऱ्याचदा सामान किंवा कचरा कोंबण्यासाठी करत असत.
या सर्व फोटोंचे बारकाईने निरीक्षण करून आणि ‘आयएसएस’ प्रकल्पातील पद्धतींचा वापर करून संशोधक आता एव्हरेस्ट बेस कॅम्पवर होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवणार आहेत. मुलाखतीच्या शेवटी जस्टिन वॉल्श म्हणतात, ‘या सर्व छायाचित्रांचा अभ्यास करून आणि अंतराळ स्थानक प्रकल्पातील पद्धतींचा अवलंब करून, आपल्याला हे पाहण्याची संधी मिळते की मानव अशा अशक्य ठिकाणी स्वतःला कसे जुळवून घेतो, जिथे मुळातच आपले जाणे किंवा अस्तित्व असणे अत्यंत कठीण आहे.”