First Plague History | ५,५०० वर्षांपूर्वी सायबेरियात आला होता जगातील पहिला 'प्लेग' 
विश्वसंचार

First Plague History | ५,५०० वर्षांपूर्वी सायबेरियात आला होता जगातील पहिला 'प्लेग'

लहान मुले ठरली होती मुख्य बळी; संशोधनातून नवा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मानवी इतिहासातील सर्वात जुन्या आणि पहिल्या 'प्लेग'च्या साथीचा शोध लावण्यात वैज्ञानिक आणि संशोधकांना यश आले आहे. तब्बल ५,५०० वर्षांपूर्वी सायबेरियातील बैकाल सरोवराच्या परिसरात राहणाऱ्या शिकारी जमातींमध्ये प्लेगची ही भयानक साथ पसरली होती. या जीवघेण्या आजाराचा सर्वाधिक फटका निष्पाप लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना बसला होता, असा धक्कादायक खुलासा एका ताज्या संशोधनातून झाला आहे. प्रसिद्ध 'नेचर' या सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले असून, यामुळे प्लेग या रोगाच्या उत्पत्तीचा इतिहास पूर्णपणे बदलला आहे.

डीएनए (DNA) चाचणीतून रहस्य उघड

युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन, केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या संशोधकांनी बैकाल सरोवर परिसरातील चार प्रागैतिहासिक दफनभूमींमधील मानवी अवशेषांचा अभ्यास केला. मृतदेहांच्या दातांमधून मिळालेल्या प्राचीन डीएनएच्या तपासणीत 'येर्सिनिया पेस्टिस' या प्लेगच्या जीवाणूचे (बॅक्‍टेरिया) अंश सापडले. एकूण तपासलेल्या ४६ मृतदेहांपैकी १८ जणांना प्लेगचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. या संशोधनापूर्वी असा समज होता की, जेव्हा मानवाने शेती करायला सुरुवात केली आणि लोकसंख्या वाढली, तेव्हाच प्लेगसारख्या साथीचे आजार पसरले. मात्र, अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या आणि जंगलात भटकणाऱ्या शिकारी जमातींमध्येही प्लेगने थैमान घातले होते, हे पाहून संशोधक थक्क झाले आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की, या भागात राहणारे लोक शिकार आणि अन्नासाठी 'मार्शमॉट' (खारीच्या किंवा घोरपडीच्या प्रजातीचा एक मोठा उंदीरवर्गीय प्राणी) या प्राण्याच्या संपर्कात आले. या प्राण्याचे कच्चे मांस खाल्ल्याने किंवा त्याला हाताळल्याने हा जीवाणू माणसांमध्ये आला आणि नंतर खोकण्याद्वारे तो माणसांमधून माणसांमध्ये पसरला.

लहान मुलांसाठी अधिक घातक; काय होते कारण?

१४ व्या शतकात युरोपची अर्धी लोकसंख्या संपवणाऱ्या 'ब्लॅक डेथ' या प्लेगच्या रूपापेक्षा ५,५०० वर्षांपूर्वीचा हा प्लेग वेगळा होता. संशोधानदरम्‍यान दफनभूमीत सापडलेले बहुतांश मृतदेह हे ८ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांचे आहेत. अनेक ठिकाणी सख्ख्या भावा-बहिणींना एकत्र दफन करण्यात आले होते. या प्राचीन प्लेगच्या जीवाणूमध्ये नंतरच्या प्लेगसारखा 'पिसांद्वारे' पसरणारा जनुक नव्हता. मात्र, त्यामध्ये एक असा जनुकीय प्रकार होता, ज्यामुळे शरीरात तीव्र जळजळ आणि अंतर्गत सूज निर्माण होत असे. या गुंतागुंतीला लहान मुले लवकर बळी पडत असत. या शोधामुळे मानवी इतिहासाला हादरवून सोडणाऱ्या एका सर्वात घातक आजाराच्या सुरुवातीच्या प्रभावाविषयी आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. हा प्लेगचा उत्क्रांतीचा 'संक्रमण काळ' होता, जिथे हा आजार अत्यंत जीवघेणा होता, असे जनुकशास्त्रज्ञ एस्के विलर्सलेव्ह यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT