लंडन : मृत्यूनंतर नेमके काय होते? हा मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि गूढ प्रश्न आहे. मात्र, आता वैज्ञानिकांनी या गूढ उकलण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. ब्रिटन आणि स्पेनमधील १३ रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, हृदय बंद पडलेल्या आणि ‘क्लिनिकल डेथ’च्या स्थितीत असलेल्या रुग्णांच्या मेंदूत चेतनेची (कॉन्शसनेस्) चिन्हे कायम असतात.
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असलेल्या १४० हून अधिक रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगादरम्यान, पुनरुज्जीवन (रिस्सिटेशन्) प्रक्रियेच्या पहिल्या दोन मिनिटांत स्पीकरद्वारे काही विशिष्ट आवाज (जसे की पावसाचा आवाज, पक्ष्यांचे किलबिलाट आणि नवीन संगीत) वाजवण्यात आले. त्यानंतर बरे झालेल्या रुग्णांची स्मरणशक्ती तपासण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली. ज्या रुग्णांना उपचारादरम्यान निसर्गाचे आवाज किंवा विशेष धून ऐकवण्यात आल्या होत्या, त्यांनी योग्य प्रकारे त्या आठवल्या आणि चाचणीत चांगला स्कोअर केला. यावरून असे दिसून आले की, मेंदूची ऑक्सिजन पातळी कमी झाली असली किंवा रुग्ण बेशुद्ध किंवा ‘क्लिनिकल डेथ’च्या स्थितीत असला, तरी मानवी चेतना आणि माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता अत्यंत बिकट परिस्थितीतही तग धरून राहू शकते.
या संशोधनामुळे ‘मृत्यूनंतरही चेतना टिकून राहू शकते’ या सिद्धांताला बळकटी मिळाली आहे. वैज्ञानिकांच्या मते, बाह्यतः रुग्ण अज्ञानात किंवा मृतवत भासत असला तरी त्याच्या अंतर्मनात जाणिवा शिल्लक असू शकतात. यामुळेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णावर उपचार करताना किंवा सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिसेशन ) देताना अत्यंत काळजीपूर्वक आणि आदराने संवाद साधला पाहिजे, जेणेकरून शुद्धीत आल्यावर रुग्णाला ते शब्द आठवू शकतील.