रोम : इटलीची राजधानी रोममधील एका हायस्कूलमधील जिमच्या (व्यायामशाळा) जमिनीखाली अनेक गूढ खोल्या लपलेल्या आहेत, अशा अफवा आणि कथा तेथील विद्यार्थी अनेक वर्षांपासून एकमेकांना सांगत होते. कोलोसियमच्या अगदी जवळ असलेल्या या शाळेतील या अफवांमध्ये केवळ तथ्यच नव्हते, तर त्यामागे एक मोठा ऐतिहासिक खजिना दडला असल्याचे आता समोर आले आहे. शाळेतील काही तरुण विद्यार्थ्यांनी केलेल्या गुप्त मोहिमेदरम्यान त्यांना जिमच्या खाली एक प्राचीन वास्तू आढळली. त्यांनी त्वरित आपल्या शिक्षकांना याची कल्पना दिली. शिक्षकांनी पुरातत्त्व विभागाला पाचारण केले आणि नुकत्याच झालेल्या उत्खननानंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी एक थक्क करणारा खुलासा केला आहे. त्या अंधाऱ्या आणि विस्तीर्ण खोल्या प्रत्यक्षात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील एका अत्यंत आलिशान रोमन राजवाड्याचा भाग आहेत.
‘लिसेओ सायंटिफिको कॅव्हूर’ ही हायस्कूलची इमारत १८व्या शतकाच्या उत्तरार्धात एका कॅथोलिक मिशनरी संस्थेसाठी बांधण्यात आली होती. त्यावेळी पायाभरणी करताना येथे प्राचीन रोमन घराचा म्हणजेच ‘डोमस’चा काही भाग सापडला होता. रोमन इतिहासाच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण येथे सिसेरो, पॉम्पी आणि ऑक्टाव्हियन (ऑगस्टस) यांसारख्या महान ऐतिहासिक व्यक्ती राहत होत्या. मात्र, वर आधुनिक इमारती बांधल्या गेल्यामुळे खालील प्राचीन थरांचा पुरातत्त्वीय अभ्यास करणे शक्य झाले नव्हते. शाळेतील इतिहास आणि लॅटिन भाषेच्या शिक्षिका क्लॉडिया मारिनो यांनी विद्यार्थ्यांनी शोधलेल्या या भुयारांबद्दल रोमच्या विशेष पुरातत्त्व विभागाला माहिती दिली. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये येथे अधिकृत उत्खनन सुरू करण्यात आले.
२८ मे २०२६ रोजी शिक्षिका मारिनो आणि पेरुगिया विद्यापीठाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ फिलिपो कोआरेली यांनी हा शोध अधिकृतपणे जगासमोर आणला. संशोधकांच्या मते, हायस्कूलच्या जिमखाली सापडलेल्या या खोल्या दुसऱ्या शतकाच्या मध्यातील एका मोठ्या घराचा भाग आहेत. १९ व्या शतकाच्या शेवटी झालेल्या उत्खननात सापडलेल्या एका शिलालेखावरून, हे घर ‘उम्ब्रीएस’ कुटुंबाच्या मालकीचे असावे असा अंदाज आहे. या कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी ते दक्षिण-मध्य इटलीतील ‘सॅमनिअम’ या भागातील असावेत, जो भाग इसवी सन ७९ मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकात नष्ट झालेल्या प्रसिद्ध ‘पाँपेई’ शहराच्या जवळ आहे. सध्या या प्राचीन वास्तूला ‘डोमस लिसेओ कॅव्हूर’ असे नाव देण्यात आले आहे. शाळेच्या आवारातच सापडलेल्या या १८०० वर्षे जुन्या इतिहासामुळे सध्या संपूर्ण इटलीमध्ये या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.