सुरत : जर जिद्द आणि कल्पकता असेल, तर टाकाऊतूनही टिकाऊ आणि मौल्यवान वस्तू बनवता येते, हे सुरतच्या तीन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. भगवान महावीर युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी शिवम मौर्य, गुरप्रीत अरोरा आणि गणेश पाटील यांनी मिळून ‘गरुड’ नावाची एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक सुपरबाईक तयार केली आहे. ही बाईक पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर आधारित असून, तिचा लूक एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील बाईकसारखा वाटतो.
‘गरुड’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या बाईकचा 50 टक्के भाग जुन्या भंगारातून आणि रिसायकल केलेल्या साहित्यातून तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सुमारे 1.8 लाख रुपये खर्च करून हा प्रोटोटाईप (नमुना) तयार केला. आयताकृती पाईप्स जोडून या बाईकची फ्रेम बनवण्यात आली आहे, जी तिला मजबुती आणि एक वेगळा ‘फ्युचरिस्टिक’ लूक देते. या बाईकमध्ये Raspberry Pi मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे, जे एखाद्या कॉम्प्युटरप्रमाणे काम करते. ही भारतातील पहिली अशी बाईक असल्याचा दावा केला जात आहे, जी तुमच्या आवाजावर चालते.
तुम्ही बोलून बाईकचा वेग कमी करू शकता किंवा तिला थांबण्याचे निर्देश देऊ शकता. वाय-फाय कनेक्टिव्हिटीमुळे ही बाईक स्वतःचा वेग नियंत्रित करण्यास सक्षम आहे. सुरक्षेच्या द़ृष्टीने यामध्ये AI आधारित दोन हाय-रेंज सेन्सर्स लावले आहेत : 12 फूट अंतर : जर कोणतेही वाहन 12 फूट अंतरावर असेल, तर बाईक आपोआप आपला वेग कमी करते. 3 फूट अंतर : जर अडथळा 3 फूट अंतरावर आला, तर ‘गरुड’ आपोआप पूर्णपणे थांबते. म्हणजेच, ब्रेक न लावताही ही बाईक सुरक्षितपणे थांबू शकते. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये Hubless Wheels (मध्यभागी स्पोक्स किंवा हब नसलेली चाके) वापरण्यात आली आहेत.
शक्तीसाठी यामध्ये लिथियम-आयन बॅटरी आहे : इको मोड : एका चार्जमध्ये 220 कि.मी. धावते. स्पोर्ट मोड : 160 कि.मी.ची रेंज मिळते. विशेष म्हणजे ही बाईक अवघ्या 2 तासांत फूल चार्ज होते. या सुपरबाईकमध्ये एका मोठ्या टचस्क्रीन डॅशबोर्डसह GPS नेव्हिगेशन, म्युझिक आणि फोन कनेक्टिव्हिटी दिली आहे. ट्रॅफिकवर लक्ष ठेवण्यासाठी पुढे आणि मागे कॅमेरे बसवले आहेत, ज्याचा लाईव्ह फीड स्क्रीनवर दिसतो. तसेच, मोबाईल चार्ज करण्यासाठी यामध्ये वायरलेस चार्जिंग पॅडची सोयही देण्यात आली आहे.