वॉशिंग्टन : विज्ञानातील प्रगती कधीकधी अनपेक्षित ठिकाणांहून समोर येते. अमेरिकेतील हायस्कूलमध्ये शिकणार्या माटेओ पाझ या विद्यार्थ्याने नासाच्या निवृत्त झालेल्या निओवाइझ मोहिमेतील डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून खगोलशास्त्रात खळबळ उडवून दिली आहे. माटेओने तब्बल 15 लाख असे खगोलीय घटक शोधून काढले आहेत, जे आजवर पारंपरिक पद्धतींचा वापर करणार्या खगोलशास्त्रज्ञांच्या नजरेतून सुटले होते.
नासाच्या संचालकांकडून फायटर जेट राईडचे आश्वासन
माटेओच्या या कामगिरीने नासाचे संचालक जॅड आयझॅकमन इतके प्रभावित झाले की, त्यांनी थेट सोशल मीडियावरून त्याला नोकरीची ऑफर दिली. आयझॅकमन यांनी म्हटले, माटेओ, कृपया नासामध्ये कामासाठी अर्ज कर. मी वैयक्तिकरीत्या तुला जॉइनिंग बोनस म्हणून फायटर जेटची सफर घडवून आणेन.
कॅल्टेकसोबतचे सहकार्य आणि संशोधन
माटेओच्या या प्रकल्पाची सुरुवात कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्लॅनेट फाइंडर अकादमीमध्ये झाली. पासाडेना येथील माध्यमिक शाळेत शिकत असताना त्याने खगोलशास्त्रज्ञ डेव्ही किर्कपॅट्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू केले. माटेओने स्वतःची मशिन लर्निंग प्रणाली विकसित केली आणि निओवाइझ आर्काइव्हमधील 200 अब्ज इन्फ्रारेड नोंदींचे विश्लेषण केले. मानवी संशोधकांना जे सूक्ष्म संकेत ओळखता आले नाहीत, ते या ने अचूक पकडले. अवघ्या सहा आठवड्यांत या प्रणालीने दूरवरचे क्वासार्स आणि सुपरनोव्हा शोधून काढले.
माटेओने शोधलेल्या या 15 लाख वस्तूंचे तपशील आता जागतिक स्तरावर वापरले जात आहेत. द अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये त्याचे संशोधन प्रसिद्ध झाले असून, त्याने शोधलेल्या अवकाशातील घटकांचे निर्देशांक आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या पुढील निरीक्षणांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत.